२९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ आंदोलन

मराठा कुणबी एकच ; मनोज जरांगे पाटील

0
317
Google search engine
अंतरवली सराटी (जालना) : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे. अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आंदोलनाची रूपरेषा, मराठा-कुणबी प्रश्न, तसेच ‘सगेसोयरे’ची व्याख्या स्पष्ट केली.

‘चलो मुंबई’चा मार्ग
जरांगे पाटील म्हणाले, “ २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली वरून प्रस्थान करणार आहोत. अंतरवाली-पैठण-शेवगाव (अहिल्यानगर), कल्याण फाटा-आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी), २८ रोजी खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर असा प्रवास करणार असून २८ तारखेच्या रात्री आझाद मैदानावर पोहोचणार आहोत. २९ तारखेला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत.” सरकारला उद्देशून त्यांनी सांगितले की, “आम्हाला फक्त एक रस्ता द्या. आम्हाला ट्रॅफिक जाम करायचा नाही.”
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “आमची प्रमुख मागणी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेटियर लागू करा. १३ महिन्यांपासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे. सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करून हवे. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घ्यावा. १० टक्के दिलेलं आरक्षण कधीही जाऊ शकतं. आम्हाला भाड्याने घर नको, आमच्या हक्काची जमीन द्या.”
‘सगेसोयरे’ची व्याख्या
सरकारने काढलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेवरही त्यांनी भाष्य केले. “ सगेसोयरेची व्याख्या आम्ही पूर्वी सांगितलेली आहे. पिढ्यानपिढ्या पारंपरिकरित्या लग्नसोयरीक ज्या समाजात जुळतात ते सगेसोयरे. ज्यांची कुणबी नोंद सापडली, त्यांना सगेसोयरे म्हणून घ्या. १९६७ साली ओबीसींना आरक्षण देताना पोटजात-उपजात म्हणून जवळपास १८० जाती होत्या. नंतर त्या वाढून ३५० ते ४०० झाल्या. तेव्हा फक्त ‘सगेसोयरे’ हा शब्द न वापरता पोटजात, उपजात असे नाव दिले. मग ज्यांची कुणबी नोंद सापडली, ते मराठ्याची पोटजात कुणबी ठरत नाही का, फडणवीस साहेब?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारवर टीका करताना जरांगे म्हणाले, “ तुम्ही २०१२ च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला सहा महिने वेळ द्या असं सांगितलं. आता दीड वर्ष उलटले. इतका संयम कोणता समाज दाखवतो ? आंदोलन आता खूप पुढे गेले आहे. अजून दोन दिवस तुमच्या हातात आहेत. सरकारने महाराष्ट्र आणि मराठ्यांना वेठीस धरू नये. राज्य अस्थिर करण्याचा अधिकार सरकारला नाही.”

————————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here