कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सकाळी 10 वाजल्यापासून अंकली पूल, कोल्हापूर-सांगली रोड येथे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भयावह पूरपरिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंचीवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने “चक्काजाम आंदोलन” पुकारण्यात आले.
पूरग्रस्त होण्यापासून आपल्या गाव, शेत आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी, हजारोंच्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात सामील झालेल्या शेतकरी आणि पूरबाधित नागरिकांसोबतच सर्व पक्षाचे आमदार खासदार उपस्थित होते.

जोपर्यंत सरकारकडून बैठकीसाठी कायदेशीर बोलावणे येत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका जेव्हा महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते माननीय आमदार सतेज पाटील यांनी घेतली आणि त्याप्रमाणे रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाची आक्रमकता आणि उपस्थित आंदोलकांची संख्या पाहून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत किणीकर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व पूरबाधित उपस्थित होते.



