कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरबाधित नागरिक आता अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत संघर्षाच्या मैदानात उतरलेत. १८ मे रोजी सकाळी १० वाजता जयसिंगपूर येथील अंकली नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी शाहू मार्केट यार्डमधील मल्टिपर्पज हॉलमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात या प्रश्नावर एकमुखी निर्णय घेण्यात आला
सतेज पाटील- केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागेल. पूरग्रस्तांचे हाल प्रशासनाला कधी दिसणार ? या आधीही अनेकदा धरणातून पाण्याचा विसर्ग अचानक वाढवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता ही उंची वाढ झाली तर थेट जीवितहानीच होईल. तसेच अलमट्टीची उंची वाढवण्याच्या विरोधातील महाराष्ट्र सरकारची अधिकृत भूमिका कुठेही नाही. त्यामुळे या विरोधात लढा सुरू ठेवून संघटित ताकद दाखवून दिली पाहिजे. अलमट्टीच्या उंचीचा फटका सामान्य माणसाला बसणार आहे. याबाबत केंद्राने आमचीही भूमिका ऐकून घ्यावी.
आमदार अरुण लाड- धरणाचे व्यवस्थापन हे तांत्रिक निकषांवर आधारित असले पाहिजे, राजकीय स्वार्थापोटी लाखो लोकांचे जीवन धोक्यात घालू नये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई निर्णायक ठरेल. महापुरामुळे २०१९ मध्ये दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.प्रखर आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही
संजय शेटे- अलमट्टी उंची वाढ विरोधातील सर्वपक्षीय लढ्यात व्यापारी, उद्योजक सहभागी होतील
खासदार धैर्यशील माने- महापुराचे संकट कमी करण्यासाठी नदीपात्रातील अतिक्रमण काढा पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी नदीपात्रातील अतिक्रमणे, जुन्या पद्धतीचे बंधारे आणि भराव दूर केले पाहिजे. आपल्या काही चुका असतील तर त्याही सुधारायला हव्यात. कर्नाटकला त्यांच्या चुका दुरुस्त करायला भाग पाडू, अशी ग्वाही दिली.
बैठकीत ११ ठराव मंजूर – चक्काजाम आंदोलन, जनजागृती मोहीम, आणि मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री व पंतप्रधान यांना सामूहिक निवेदन देणे. जिल्हास्तरीय लढा समित्याही स्थापन करणे. पुढील टप्प्यात ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत व्यापक जनआंदोलन.
मेळाव्यासाठी उपस्थिती – आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल कांबळे, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, बाबासाहेब देवकर, भारत पाटील-भुयेकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, राजेंद्र सूर्यवंशी, बी. एच. पाटील, दत्ता वारके, वसंतराव पाटील, अमर समर्थ, सांगलीचे रामचंद्र थोरात, शेतकरी, व्यापारी, उद्योजक.
—————————————————————————————-