नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव अधिक परिणामकारक करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. मंडळाने काही विषयांमध्ये ‘ओपन बुक एक्झाम’ पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यात विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान पाठ्यपुस्तके, नोट्स आणि इतर संदर्भ साहित्य सोबत ठेवण्याची परवानगी मिळणार आहे.
CBSE च्या मते, या पद्धतीमुळे केवळ पाठांतराचा दबाव कमी होणार नाही, तर विद्यार्थ्यांची संकल्पना समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढेल. प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने तयार केली जाईल की, पुस्तकातील मजकूर जसाच्या तसा लिहून चालणार नाही. विद्यार्थ्यांना संदर्भ घेऊन, तर्कशक्ती व सखोल आकलन वापरून उत्तर द्यावे लागेल.
या निर्णयापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी या पद्धतीचा ‘ पायलट अभ्यास ’ घेण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी ओपन बुक असेसमेंटचा अनुभव घेतला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, या पद्धतीमुळे पाठांतराचा भार कमी झाला आणि विषयाची सखोल समज निर्माण झाली. शिक्षक आणि पालकांनीही या पद्धतीचे स्वागत केले.
CBSE चा विश्वास आहे की, या बदलामुळे मूल्यांकन केवळ पाठांतरावर न राहता विद्यार्थ्यांच्या संकल्पनांच्या आकलनावर आधारित होईल आणि शिक्षण अधिक अर्थपूर्ण बनेल.
————————————————————————————–