पन्हाळा : प्रतिनिधी
जोतिबा डोंगर येथील दख्खनच्या राजाचे उंट पुष्कर आणि घोडा जय आज पोहाळे गावाकडे चार महिने मुक्कामासाठी रवाना झाले आहेत. जोतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेपासून सरंक्षण मिळावे यासाठी उंट आणि घोडा यांना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोहाळे येथे विश्रांतीसाठी पाठवलं जातं. या कालावधीमध्ये देवस्थानचे घोड्याचे सेवेक मोतदार किशोर भोसले आणि उंटाचे सेवक राजेंद्र कचरे हे दोन कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी २४ तास तैनात असतात .
जोतिबा डोंगरावर दख्खनच्या राजाच्या धुपारती, पालखी सोहळ्यामध्ये उंट आणि घोडे यांना मानाचे स्थान आहे. पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी धुपारती, रात्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा उंट , घोडेच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाळ्याच्या सुरूवातीला सरता रविवार साजरा करण्यात येतो. या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळा होतो. यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो.
यानंतर दस-यातील घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो. या दरम्यान उंट आणि घोडे यांना संपूर्ण विश्रांती दिली जाते. तसेच या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर थंड हवा असते. त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणले जाते. पोहाळे येथे उंट आणि घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे.
या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत, त्यांना लागणारा खुराक आवश्यकतेनुसार औषधे यांचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो. या कालावधीमध्ये जोतिबाचे भक्त श्रध्देने उंट घोड्याचे दर्शन घेतात तर लहान मुले कुतुहलाने उंट घोडे पहायला येतात. सध्या उंट आणि घोडे यांच्या देखभालीसाठी दोन देवस्थान कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. ते याच ठिकाणी पूर्णवेळ कार्यरत राहून उंट घोड्याची देखभाल करीत आहेत. दस-यापर्यंत यांचा मुक्काम पोहाळे येथील थट्टीमध्ये असणार आहे. या परिसरातील काही भाविक शेतकरी हे उंट आणि घोड्याला स्वतःच्या शेतातील गावात पुरवत असतात.
—————————————————————————-