मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रातील हजारो तरुणांची अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. आज, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल १४ हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या भरतीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
अनेक महिन्यांपासून थांबलेली भरती प्रक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरती प्रक्रिया विविध कारणांमुळे थांबलेली होती. यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजी होती आणि सरकारकडे वारंवार मागणी होत होती की भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी. अखेर, मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे ही प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकेल.
रोजगार वाढविण्यासाठी मोलाचा निर्णय
या भरतीमुळे केवळ हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार नाही, तर पोलीस दलात नवीन आणि ताज्या दमाच्या तरुणांची भर पडणार आहे. यामुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची पातळी उंचावेल, असे प्रशासनाचे मत आहे. महायुती सरकारने रोजगार निर्मितीला प्राधान्य देत या भरतीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भरतीची जाहिरात, अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, उमेदवार आता प्रत्यक्ष तयारीस सुरुवात करू शकतील.
मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरीवर चर्चा
मात्र, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही राजकीय घडामोडीही घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या श्रीनगरमध्ये असल्याने त्यांनी बैठकीत ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतला. तर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
रायगड जिल्ह्यात येत्या १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरेंना मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भरत गोगावले नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा रंगली.
तथापि, भरत गोगावले यांनी ही नाराजीची बातमी फेटाळून लावली. “दिल्लीत काही काम असल्यानेच बैठकीला हजर राहता आले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भरण्यात येणारी पदांची संख्या खालीलप्रमाणे
-
पोलीस शिपाई – १० हजार ९०८
-
पोलीस शिपाई चालक – २३४
-
बॅण्डस् मॅन – २५
-
सशस्त्री पोलीस शिपाई – २,३९३
-
कारागृह शिपाई – ५५४
ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेणार
पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
या भरतीच्या निर्णयानंतर राज्यभरातील तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे. पोलीस दलात सामील होणे हा अनेकांचा आयुष्यभराचा ध्यास असतो. आता औपचारिक घोषणा आणि भरती जाहिरात प्रसिद्ध होताच हजारो उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज होतील. राज्य सरकारकडून ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि जलदगतीने पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
—————————————————————————————