कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नांदणी ( ता. शिरोळ ) येथील महादेवी मठात वर्षानुवर्षे असलेली भक्तांची लाडकी माधुरी हत्तीणी वनतारा प्राणी केंद्रात हलवल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात जनतेचा संताप उफाळून आला आहे. या घटने विरोधात सध्या जिल्ह्यात विविध पातळ्यांवर आंदोलने, मोहिमा आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, एकप्रकारे हा विषय जनआंदोलनाच्या रुपात उभा राहिलाय.
राजू शेट्टींचा आक्रोश : न्याय कुणाकडे मागायचा ?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर जोरदार टीका केली आहे. “ ज्यावेळी धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करत होते, तेव्हापासून नांदणी मठ हत्तीचा सांभाळ करत होता. आता त्यांच्या मुलांनी पैसे व सत्तेच्या जोरावर वनतारा उभं करून न्यायव्यवस्थेलाही बटीक केलं आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.
“जैन समाजाची बाराशे वर्षांची परंपरा, संस्कृती, वारसा संपवण्याचा डाव रचला जात आहे. न्यायालयांची भूमिका अण्णा भाऊ साठेंच्या मतानुसार काही सत्ताधाऱ्यांची रखेल झाली आहे, हे दुर्दैव आहे,” अशी जहाल टीका करत शेट्टी यांनी रविवारी नांदणीहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रेचं आयोजन केलं आहे. या पदयात्रेत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलं जाणार आहे.
सतेज पाटील यांची सह्यांची मोहीम सुरू
या प्रकरणाला राजकीय रंग मिळू लागला असून, काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी “माधुरीला परत आणा” या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सह्या घेतल्या जात असून, हे निवेदन लवकरच शासन दरबारी पोहोचवले जाणार आहे.
‘जिओ’वर कोपाचा भडका, अंबानींविरोधात संताप
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबावर जनतेचा राग अधिकच तीव्र झाला आहे. नांदणीसह शिरोळ तालुक्यातील हजारो नागरिकांनी ‘जिओ’ सिम पोर्ट केल्याची माहिती असून, “अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार” असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. कस्टमर केअर प्रतिनिधींना थेट “अंबानींना निरोप द्या” असे सुनावणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
धैर्यशील माने संसदेत मुद्दा मांडणार
खासदार धैर्यशील माने यांनी देखील हा विषय संसदेमध्ये मांडण्याचा निर्धार केला आहे. “हा केवळ एक प्राणी नाही, तर जनतेच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यावर अन्याय सहन केला जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विनय कोरे यांची चिंता: ‘हत्तीचा मृत्यूही लपवला गेला!’
आमदार विनय कोरे यांनी माधुरीच्या वनतारा प्रस्थानावर चिंता व्यक्त करत, याआधी जोतिबाच्या सुंदर हत्तीचीही अशीच रवानगी झाली होती आणि तीन वर्षांत त्या हत्तीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला होता, हे मुद्दाम लपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘माधुरीला परत आणा’ ही मागणी आता केवळ एका गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. संपूर्ण जिल्ह्याच्या भावनांचा आणि परंपरेच्या रक्षणाचा प्रश्न म्हणून ही चळवळ वाढत आहे. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सामान्य नागरिक, आणि धार्मिक संस्था सर्वच स्तरातून आवाज उठवला जात आहे. माधुरीसाठीचा एल्गार आता निर्णायक वळणावर आहे…
————————————————————————————-