प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
आपण आरोग्यासाठी सतत धावपळ करत असतो. कधी जिम, कधी डाएट, कधी औषधे. पण बहुतांश वेळा आपण एक मोठी चूक करतो आपण स्वतःला फक्त हाडामांसाचं शरीर समजतो. प्राचीन उपनिषदांनी हजारो वर्षांपूर्वी स्पष्ट सांगितलं आहे की मानव हा केवळ शरीर नसून पंचकोशांनी बनलेला एक बहुस्तरीय अस्तित्व आहे.
हे पंचकोश म्हणजे अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष. आजच्या बहुतांश आजारांचं मूळ केवळ शरीरात नसून या आतल्या स्तरांमध्ये दडलेलं असतं. म्हणूनच केवळ लक्षणांवर उपचार करून संपूर्ण आरोग्य मिळू शकत नाही.
अन्नमय कोष म्हणजे आपलं भौतिक शरीर. याच्या आत आहे प्राणमय कोष ऊर्जेचं शरीर. आपण “आज खूप एनर्जी आहे” किंवा “आज पूर्णपणे थकलोय” असं म्हणतो, तो अनुभव याच प्राणमय कोशाचा असतो. ही प्राणशक्तीच जीवन आणि मृत्यू यांच्यातील सेतू आहे.
यानंतर येतो मनोमय कोष मन, विचार, भावना आणि अहंकाराचा स्तर. मनात साठलेला ताण, भीती किंवा दाबलेल्या भावना थेट शरीरावर परिणाम करतात. त्यामुळेच मानसिक तणावामुळे डोकेदुखी, पोटाचे विकार किंवा श्वसनाचे त्रास उद्भवू शकतात.
याहून खोल स्तर म्हणजे विज्ञानमय कोष बुद्धी, विवेक आणि समजुतीचा स्तर. आणि सर्वात आत आहे आनंदमय कोष आपला मूळ स्वभाव. आनंद, शांतता आणि परमानंद ही काही मिळवायची गोष्ट नाही; ती आपली नैसर्गिक अवस्था आहे.
मग प्रश्न असा पडतो की, जर आनंद आपला स्वभाव आहे, तर आपण सतत आनंदी का नसतो? कारण आपण आनंद बाहेर शोधतो. उपनिषदांमध्ये यासाठी आकाशाचं सुंदर उदाहरण दिलं आहे. आकाश कायम निर्मळ असतं. ढग येतात आणि जातात, पण आकाश बदलत नाही. आपल्या आयुष्यातील राग, दुःख, अपमान, भीती हे ढगांसारखे आहेत. आपण स्वतःला ढग समजतो, आकाश विसरतो.
याच ठिकाणी चेतनेची संकल्पना येते. चेतनेच्या दोन अवस्था सांगितल्या जातात संकुचित चेतना आणि विस्तारित चेतना. संकुचित चेतना भीती, राग आणि असुरक्षिततेने भरलेली असते. या अवस्थेत आपण परिस्थितीचे गुलाम बनतो. विस्तारित चेतना प्रेम, स्वीकार आणि जागरूकतेने भरलेली असते. या अवस्थेत भावना येतात, पण त्या आपल्यावर राज्य करत नाहीत.
भावना येणं चूक नाही; त्या दाबून ठेवणं धोकादायक आहे. इथेच ‘कॅथार्सिस’ किंवा भावनांचे विसर्जन महत्त्वाचं ठरतं.[‘कॅथार्सिस’ (Catharsis) हा मूळ ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘शुद्धीकरण’ असा होतो.] म्हणजे मनामध्ये साचलेल्या तीव्र भावना, दडपलेले विचार किंवा जुन्या वेदना बाहेर काढून मनाचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत सांगायचे तर, “मनाचा निचरा करून मिळणारी शांती.” भावना व्यक्त करणं आणि भावना मोकळ्या करणं यात मोठा फरक आहे. फक्त बोलून किंवा तक्रार करून भावना सुटत नाहीत; अनेकदा त्या अधिक घट्ट बसतात.
दाबलेल्या भावना राग, दुःख, अपमान, भीती या शरीरात ऊर्जा अडथळ्यांच्या स्वरूपात साठतात. काही वेळा त्यांचं रूपांतर आजारात होतं. योग्य पद्धतीने या भावनांना बाहेर पडू दिलं, तर शरीर आणि मन दोन्ही हलके होतात.
‘कॅथार्सिस’ ही एक अशी प्रक्रिया आहे जी या दडलेल्या भावनांना सुरक्षितपणे बाहेर काढते. तीव्र श्वसन, भावनांचं मुक्त उत्सर्जन, नाभी केंद्राशी जोडलेलं श्वसन, शांत निरीक्षण आणि शेवटी आनंदाची अवस्था अशा टप्प्यांतून ही प्रक्रिया जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा मुक्त होऊन मन पुन्हा संतुलित होतं.
दैनंदिन जीवनासाठी मात्र कुंभक ही सर्वात प्रभावी आणि सुरक्षित साधना मानली जाते. कुंभक म्हणजे श्वास काही काळ रोखून धरणे. योग्य पद्धतीने केल्यास कुंभक शरीरासाठी धोकादायक नसून अत्यंत पोषक ठरतो.
कुंभक म्हणजे शरीराच्या बॅटरीला डीप चार्ज देणं.
श्वास रोखताना केवळ हवा नाही, तर प्राणशक्ती संपूर्ण शरीरात साठवली जाते.
सोप्या कुंभक पद्धतींमुळे मज्जासंस्था शांत होते, शरीर ‘फाईट किंवा फ्लाईट’ अवस्थेतून ‘रेस्ट अँड हील’ अवस्थेत येतं. हीच अवस्था शरीराच्या नैसर्गिक उपचारक्षमतेला सक्रिय करते.
आपले पूर्वज हे ज्ञान केवळ पुस्तकी नव्हे तर अनुभवातून जगत होते. त्यांची चेतना विस्तारित होती, म्हणूनच शून्याची संकल्पना, अंतराळातील मोजमापे आणि अस्तित्वाची खोल सत्ये त्यांना समजू शकली. हीच शक्ती आजही आपल्यात आहे फक्त अज्ञानाची धूळ साफ करायची आहे.
श्वास, कुंभक आणि ‘कॅथार्सिस’ या साधनांच्या मदतीने आपण आपल्या चेतनेचा विस्तार करू शकतो, दाबलेल्या भावनांना मुक्त करू शकतो आणि आपल्या मूळ आनंदमय स्वभावाचा पुन्हा अनुभव घेऊ शकतो. आयुष्य केवळ निभावून नेण्यासाठी नाही, तर जागरूकतेने आणि आनंदाने जगण्यासाठी आहे.
कुंभक म्हणजे काय?
कुंभक म्हणजे श्वास काही काळ जाणीवपूर्वक स्थिर (रोखून) धरणे.
हे केवळ श्वास थांबवणे नसून, प्राणशक्ती साठवण्याची आणि मज्जासंस्था शांत करण्याची प्रक्रिया आहे.
कुंभक करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना
- पोट रिकामं असावं (सकाळी किंवा जेवणानंतर किमान 3 तासांनी)
- शांत जागा निवडा
- जबरदस्ती अजिबात करू नका
- चक्कर, घुसमट, घाबरटपणा वाटला तर त्वरित थांबा
कुंभक करण्याची सर्वात सोपी पद्धत (नवशिक्यांसाठी) पद्धत 1:
1–2–4 कुंभक (सोपे प्रमाण)
ही पद्धत सर्वात सुरक्षित आहे कसे करायचे ते पाहू
- आरामात बसा (सुखासन / खुर्चीवर सरळ पाठ)
- डोळे बंद करा.
- नाकातून हळू श्वास घ्या – 3 सेकंद
- श्वास आतच शांतपणे रोखून ठेवा – 6 सेकंद
- नाकातून हळूहळू श्वास सोडा – 12 सेकंद
- बाहेर श्वास रोखू नका (नवशिक्यांसाठी नाही)
- हे 5 ते 7 फेऱ्या करा
कुंभक करताना लक्ष कुठे ठेवायचे?
श्वास रोखताना लक्ष हृदयात किंवा भुवयांच्या मधोमध व मनात हळूच म्हणू शकता
“सुरक्षित आहे… शांत आहे…”
पद्धत 2 : बॉक्स ब्रीदिंग (अत्यंत सोपी)
जर श्वास रोखायला भीती वाटत असेल तर ही पद्धत करा.
- 4 सेकंद श्वास घ्या
- 4 सेकंद आत रोखा
- 4 सेकंद श्वास सोडा
- 4 सेकंद थांबा असे 5 मिनिटे करा.
कुंभक रोज किती वेळ करायचा?
सुरवातीला तुम्ही 3–5 मिनिटे करू शकता नंतर 10–15 मिनिटापर्यंत वाढवू शकता.आणि हो रोज एकदाच पुरेसं आहे.
कुंभकाचे लगेच जाणवणारे फायदे
- मन शांत होतं
- ओव्हरथिंकिंग कमी होतं
- हृदयगती स्थिर होते
- झोप सुधारते
- आतून स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो
कोणांनी दीर्घ कुंभक टाळावा ज्यांना हृदयविकार,तीव्र अॅन्झायटी / पॅनिक अटॅक,गर्भावस्था (अशांनी फक्त श्वास घेणे सोडणे, श्वास रोखू नये)
लक्षात ठेवा कुंभक करणे म्हणजे ही स्पर्धा नाही, साधना आहे.जितका श्वास शांत, तितकं मन स्थिर.






