चंदगड : प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व वळीव पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शिवारात प्रमाणापेक्षा जादा ओल झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. एकंदरीतच वळवाने दाणादाण उडवल्यामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असतानाच वळीव पावसाने गेल्या चार दिवसांपासून झोडपून काढले आहे. शेतशिवारांत पाणीच पाणी झाले आहे. ओल्या जमिनीत पेरणी करणे अशक्य झाले आहे. ऊस पिकांना रासायनिक खतांचे डोस तसेच नांगरटी, भरणी करण्याची कामे खोळंबली आहेत.
सलग पाच-सहा दिवस पाऊस गेला तरच खोळंबलेल्या कामांना गती येणार आहे, अन्यथा शेतकऱ्यांना पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या बारमाही तुडुंब राहिल्याने गेल्या दोन-तीन दशकांपासून सुमारे २० लाख मे. टन उसाचे उत्पादन घेतले जात आहे.
उर्वरित क्षेत्रात खरीप पिकांची लागवड केली जाते. यामध्ये भात, नाचणी, रताळी भुईमूग, मिरची आदी. पिके घेतली जातात. भाताची रोप लागण करण्यापूर्वी तरवे पेरण्यासाठीही आता उघडिपीची गरज आहे. पावसाने चांगली उघडीप दिल्यानंतरच शेतीकामांना वेग येणार आहे.
—————————————————————————————–






