नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिका-भारत संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. व्हाइट हाऊसचे ‘डायरेक्टर ऑफ प्रेसिडेंशियल पर्सनल’ आणि ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी सर्जियो गोर यांची भारतात अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त असल्याने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती.
सर्जियो गोर कोण ?
सर्जियो गोर हे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून पुढे आलेले नाव आहे. वातावरण निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता, म्हणूनच ट्रम्प त्यांना अतिशय जवळचे मानतात. निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना व्हाइट हाऊसचे ‘डायरेक्टर ऑफ प्रेसिडेंशियल पर्सनल’ पद दिले. गोर यांचा जन्म उझबेकिस्तान मधील ताश्कंद येथे झाला. १९९९ मध्ये ते वयाच्या बाराव्या वर्षी कुटुंबासह अमेरिकेत आले. त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतले आणि नंतर रिपब्लिकन खासदारांचे प्रवक्ते म्हणून काम केले. त्यानंतर ते ट्रम्प यांच्या टीममध्ये सामील झाले.
भारतात नेमणुकीमागील कारण
३९ वर्षीय गोर यांची भारतातील नियुक्ती अशा काळात होत आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात मतभेद वाढले आहेत. ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० % शुल्क (tariff) लावण्याचा निर्णय घेतला असून तो २७ ऑगस्ट पासून लागू होणार आहे. एका बाजूला दबावाची ही भूमिका असली तरी दुसऱ्या बाजूला संवादाचे दार उघडे ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. या नियुक्तीला सिनेटची मंजुरी मिळाल्यास, भारत-अमेरिका संबंध पुन्हा रुळावर येण्याची अपेक्षा आहे.
चीन आणि रशिया समीकरण
अमेरिकेच्या दबावानंतर भारताने चीन सोबतचे संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियन आणि रशियासोबतही भारत व्यापार वाढवत आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प प्रशासन नाराज आहे. चीन विरुद्ध अमेरिकेच्या रणनीतीत भारताची साथ महत्त्वाची असल्याने ट्रम्प यांनी विश्वासू सहकाऱ्याला दिल्लीत पाठवून मोठा संदेश दिला आहे.
पाकिस्तान फॅक्टर
गोर यांना ‘स्पेशल एनवॉय फॉर साउथ अँड सेंट्रल एशियन अफेयर्स’ या पदाची अतिरिक्त जबाबदारीही मिळणार आहे. त्यामुळे ते पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांशीही संवाद साधणार आहेत. अमेरिका भारत आणि पाकिस्तानला एकाच संदर्भात पाहण्याचा प्रयत्न करू शकते, जे भारतासाठी नवे आव्हान ठरू शकते.
तणावाची मुख्य कारणे
-
रशियासोबत व्यापार : भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिका अस्वस्थ आहे.
-
कृषी आणि दुग्धव्यवसाय करार : भारताने अमेरिकेच्या कृषी व दुग्ध उत्पादनांना बाजारपेठ नाकारली.
-
ब्रिक्स फॅक्टर : भारत ब्रिक्स गटात सक्रिय असून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.
सर्जियो गोर यांची भारतातील नियुक्ती ही केवळ राजनैतिक औपचारिकता नसून ट्रम्प प्रशासनाची रणनीती आहे. भारताशी संवाद सुधारणे, चीनविरुद्ध भारताला महत्त्वाचा भागीदार ठेवणे आणि दक्षिण आशियातील समीकरणे अमेरिकेच्या बाजूने फिरवणे, हा यामागचा उद्देश मानला जात आहे. ही नेमणूक दोन्ही देशांच्या संबंधांना नवा टप्पा देऊ शकते.
——————————————————————————————–



