अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय लोकशाहीचे रूप हे विशाल, विविध आणि गुंतागुंतीचे आहे. इथे मतांची गणितं, जातीधर्माचे समीकरण, प्रचाराचे तंत्रज्ञान आणि स्थानिक सामाजिक भावनांचा गुंता – हे सगळं निवडणुकांच्या केंद्रस्थानी असतं. परंतु याच राजकीय रणांगणात एक असा अघोरी आणि अदृश्य घटकदेखील अस्तित्वात आहे तो म्हणजे काळी जादू आणि अंधश्रद्धा. देशाला पुरोगामी विचार देणाऱ्या महाराष्ट्रात या लोकशाहीच्या उत्सवात काळ्या जादूची दुकानं उघडून बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार आणि रायगडचे पालकमंत्री भारत गोगावले अलीकडेच एका वादात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये ते अर्धनग्न अवस्थेत अघोरी साधूंसोबत बसलेले दिसत आहेत. विरोधकांनी या व्हिडिओवरून थेट “काळी जादू” आणि “अघोरी पूजा” केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर लोकशाहीत घुसू पाहणाऱ्या काळी जादू आणि अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भारतीय लोकशाही हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रयोग मानला जातो. दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोट्यवधी मतदार आपला हक्क बजावतात. मात्र निवडणुकांदरम्यान अनेक विचित्र गोष्टी समोर येतात. त्यातलीच एक म्हणजे निवडणुकीत काळी जादू, टोणा-टोटके वापरले जातात अशी भावना जी अफवा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर उभी असते. ग्रामीण भागात निवडणुकांदरम्यान अनेकदा अंधश्रद्धा, टोणा-टोटके आणि काळी जादू यांचे प्रचंड प्रमाणात दर्शन घडते. स्थानिक पातळीवरील राजकारणात भावनिकता, भीती आणि धार्मिक विश्वास यांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे काही उमेदवार किंवा त्यांचे समर्थक प्रतिस्पर्ध्यांवर प्रभाव टाकण्यासाठी अघोरी पूजांचा, लिंबू-मिरचीचा, राखरेषांचा वापर करतात. हे प्रकार मतदारांच्या मनात भीती निर्माण करून मतदानाच्या निर्णयावर परिणाम घडवण्याचा प्रयत्न करतात. अशा अफवा आणि कृतीमुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येते.
ग्रामीण भागात आजही परंपरा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा जनजीवनावर मोठा प्रभाव आहे. शिक्षणाची पातळी तुलनेत कमी असल्यानं अनेकदा घटनांमागे वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी धार्मिक किंवा भूतबाधा, टोणगा अशा अघोरी कारणांची कल्पना केली जाते. निवडणुकीच्या काळात हीच मानसिकता राजकीय फायद्यासाठी वापरण्यात येते. विरोधकांवर प्रभाव टाकण्यासाठी टोणगा, काळी जादू किंवा अघोरी पूजा केल्याचे नाटक केले जाते किंवा अफवा पसरवल्या जातात. मतदार घाबरून जातो, त्याच्या मनात “ही व्यक्ती शक्तिशाली आहे” किंवा “या उमेदवारावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे” अशा भावना निर्माण होतात. अशा पद्धतीने भीती आणि अंधश्रद्धा यांच्या आधारे मतांचा कल वळवण्याचा प्रयत्न होतो. ही मानसिकता म्हणजे लोकशाहीच्या मूळ मूल्यांवर आधारित नसलेली पण भावनिक, भितीजन्य आणि अपूर्ण माहितीतून तयार झालेली आहे.
आता हे ग्रामीण राजकारणातील ‘फ्याड’ आता राज्याच्या राजकारणात देखील येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू, टोणगे, किंवा अघोरी प्रथा यांचे अनेक वेळा अप्रत्यक्ष उल्लेख किंवा आरोप झाले आहेत. ही प्रकरणं अनेकदा अफवा, राजकीय प्रचार, किंवा प्रतिमाहननाचे उपाय म्हणून समोर आली असली, तरी ती राजकीय मानसिकतेत अंधश्रद्धेचा प्रभाव दाखवतात. गत काळात सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू केल्याचे प्रकार घडले आहेत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाचे नेते भारत गोगावले यांच्यावर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले म्हणून गुवहाटी येथे जाऊन काळी जादू केल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे पण त्यांच्या काळ्या जादूच्या आरोपात सध्या स्पष्ट पुरावे आणि तपासाचा अभाव दिसतो. हा प्रकार फक्त राजकीय आरोप म्हणून पुढे येत आहे मात्र या प्रकारामुळे भारतीय लोकशाहीच्या नितीमुल्यांना धोका पोहचून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची बदनामी होत असल्याचा मुख्य मुद्दा बाजूला पडत आहे.
गोगावले यांच्या या प्रकरणात त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू विरोधी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ३, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो पण यासाठी अगोदर या आरोपांची दखल घेऊन त्याची चौकशी करून तपासात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. सरकारने जर ही इच्छाशक्ती दाखवली तर भविष्यात लोकशाहीच्या नितीमुल्यांना धोका पोहचवू पाहणाऱ्या आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची बदनामी करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल..