प्रसारमाध्यम : अमोल शिंगे
ज्या छत्रपती शाहू महाराजांनी देशाला पुरोगामी विचार दिला त्यांच्याच कोल्हापूर जिल्ह्यात भानामतीसारखे प्रकार वाढताना दिसत आहेत. कालच छत्रपती शाहू महाराजांच्या नावानेच असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यात भानामती सारखा अघोरी प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेला बळी पडून समाजातील काही लोक अजूनही असल्या थोतांडावर विश्वास ठेवतात हीच गोष्ट आपल्या समाजासाठी निश्चितच भूषणावह नाही. लोक आशा अंधश्रद्धेच्या आहारी का जातात? त्यांची यामागची मानसिकता काय असते? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काय सांगतो आणि त्याची अंमलबजावणी कितपत होते यावर आपल्या प्रसारमाध्यमच्या माध्यमातून एक प्रकाश झोत टाकत आहोत.
भानामती, करणी यासारखे अंधश्रद्धेचे प्रकार प्रामुख्याने ग्रामीण भागात होत असतात पण आता या प्रकारांना शहरी भाग सुद्धा अपवाद राहिलेला नाही. शहरी भागात सुद्धा तिकटीवर, चौकाचौकात उतरून टाकलेले लिंबू आणि तत्सम वस्तु सर्रास दिसू लागल्या आहेत.
आपण एकवीसाव्या शतकाकडे चाललो असताना अजूनही आपला समाज आशा अंधश्रद्धेला का बळी पडत आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. या पाठीमागे भिती, असुरक्षितता आणि अज्ञान ही तीन प्रमुख कारणे आहेत. याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोण न ठेवता चमत्कारावर विसंबून राहाण्याची वाढती प्रवृत्ती लोकांना आशा अंधश्रद्धेला बळी पडायला भाग पाडते.
भानामती आणि करणी सारख्या अघोरी क्रिया करणाऱ्या आणि करायला सांगणाऱ्या व्यक्ति या मानसिक आजाराने देखील त्रस्त असतात. पॅरानोइया, स्किझोफ्रेनिया हे महत्वाचे दोन मानसिक आजार या प्रकारच्या लोकांमध्ये दिसून येतात. हा आजार झालेल्या लोकांना वास्तव आणि भ्रम यातला फरकच समजत नाही. आशा लोकांच्या भितीचा, अज्ञानाचा आणि मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून स्वतचा आर्थिक फायदा उठवणाऱ्या भोंदुबाबांचे देखील प्रमाण वाढताना दिसत आहे. पण याच प्रमाणात लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोण वाढवून त्यांचे प्रबोधन करणारी समांतर व्यवस्था ना सरकारला उभी करता आली ना पुरोगामी विचारांच्या संस्थाना उभी करता आली. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रयत्न केले म्हणून निदान तत्कालीन महाराष्ट्र सरकारने २६ ऑगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आणला. पण या कायद्याचा प्रभावीपणे वापर केला गेला नसल्यामुळे या भोंदूबाबांना आणि अघोरी कृत्य करणाऱ्या लोकांना वचक राहिला नाही.
सन २०२३ च्या आकडेवारीनुसार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत १००० गुन्हे नोंदवले गेले आहेत. यापैकी फक्त ३० गुन्ह्यामध्ये दोषसिद्धी होऊन संबंधित गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. गुन्ह्यांचे नोंद होण्याचं प्रमाण आणि शिक्षा होण्याचं प्रमाण पाहता हा कायदा अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. त्याच बरोबर समाजात जनजागृती करून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रत्येक घटकाचा वैज्ञानिक दृष्टिकोण वाढवण्याची सुद्धा गरज आहे.