मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा सध्या चांगलीच गाजत असताना, त्याचे पडसाद आता विधान परिषदेतही उमटताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या सत्रात भाजपचे आमदारांनी थेट आपल्याच सरकारच्या विरोधात आवाज उठवला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
अल्पकालीन चर्चेच्या लेखी प्रस्तावाच्या माध्यमातून भाजपचे आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यात हिंदू तरुणांवर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. त्यांनी मागील काही महिन्यांतील घटनांचा दाखला देत, “हिंदू तरुणांवर अन्याय होत असून, पोलीस प्रशासन निवडक पद्धतीने कारवाई करत आहे,” असा ठपका ठेवला.
विशेष म्हणजे, सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजप आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न महायुतीतील अंतर्गत तणावाचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय दबावामुळे खोटे गुन्हे दाखल
भाजप आमदारांनी सभागृहात उपस्थित करताना दावा केला की, रत्नागिरी जिल्ह्यात काही निवडक प्रकरणांमध्ये हिंदू समाजातील तरुणांवर खोट्या गुन्ह्यांद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी या संदर्भात सरकारकडून तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
महायुतीत विसंवाद
भाजप आमदारांचा हा मुद्दा सार्वजनिकरित्या विधान परिषदेत मांडण्यात आल्यानंतर महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत समन्वय आणि विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आपल्याच सरकारच्या विरोधात भाजप आमदारांनी आवाज उठवणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. याप्रकरणी आता सरकारची भूमिका काय असेल आणि विरोधक या मुद्द्यावर काय भांडवल करतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
————————————————————————————–