कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे थेट मैदानात उतरले आहेत.
आज चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भाजपच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा केली.
मंत्री चंद्रकांत पाटील – मागील निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने मिळवलेल्या ३३ जागांवर भाजपचा ठाम दावा राहणार आहे. तसेच, जर इतर जागांवर सक्षम उमेदवार उपलब्ध असतील तर त्या जागांसाठीही भाजप आग्रही राहणार आहे. “आगामी निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळवून महापालिकेत पुन्हा महायुतीचाच महापौर बसवण्याचा आमचा निर्धार आहे,” असे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपने आतापासूनच संघटनात्मक तयारीसाठी पावले उचलली असून, प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जागावाटप आणि उमेदवार निवडीसंदर्भात आगामी काही दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रा.जयंत पाटील, महेश जाधव आदी उपस्थित होते. या हालचालींमुळे कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
———————————————————————————–