कृष्णात चौगले : प्रसारमाध्यम न्यूज
मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल झाला आहे. येत्या दोन तीन दिवसांत तो महाराष्ट्रात येईल. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने बळीराजाची शेतकामांची घाई थांबली आहे. पेरणीपूर्व मशागती न झाल्याने शेतशिवार मुसळधार पावसाने चिंब झाला आहे. अशा परिस्थितीत निसर्गातील वर्षादूतांनी दिलेला सांगावा बळीराजाला फार मोठा आधार ठरत असताे.
निसर्गातील काही घडामोडी घडायच्या अगोदर मुक्या जीवांना अगोदर कळतात. त्याची चाहूल ते आपल्या कृतीतून देत असतात. काही पशुपक्ष्यांना त्यांच्या जन्मजात या बाबी मिळालेल्या असतात. पावसाची चाहूल सांगणारे आणि खात्रीने त्याची सूचना देणारे पक्षी वर्षादूत म्हणून ओळखले जातात. यातील काही पक्ष्यांची ओळख करून देताना त्यांच्याकडून येत असलेल्या संकेतांची माहिती अभ्यासकांनी नोंदवली आहेत. काही निरीक्षणे ही निसर्गचक्राची ओळख करून देणारी आहेत.
नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या आणि निसर्गात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांचा सूक्ष्म परिणाम करून घेणारे अनेक पशु-पक्षी आढळतात. आदिमानवाच्या काळापासून प्राणी पक्ष्यांच्या गमन-आगमनावरून बांधले जाणारे अंदाज शंभर टक्के खरे येतात. मानवांपेक्षा पक्ष्यांचे सेन्सर हे पावसाबद्दल जास्त कार्यक्षम असतात.
चातक पक्षी :
आफ्रिकेतून येणारे चातक पक्षी पावसाचा अंदाज अगदी अचूक देतात. पाऊस वेळेवर येणार असेल तर या पक्ष्यांचे आगमन लवकर होते. त्यांना यायला उशीर झाला तर पावसाचे आगमनही लांबते, अशी ही मान्सूनची नैसर्गिक वाटचाल थक्क करणारी आहे.
तिबोटी खंड्या :
पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनार पट्टीत आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका इ. देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होऊन येथे येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेला हा पक्षी ऑगस्ट मध्ये परतीच्या प्रवासाला निघतो. खंड्या पक्षी मे महिन्यात जर दिसला तर त्याचे दर्शन पावसाच्या आगमनाचे संकेत देणारे असते. गंमत म्हणजे मे महिन्याची १४ तारीख झाली की हे पक्षी जोरात ओरडत एकमेकांचा पाठलाग करतात. या वेळेस त्यांचा रंग अतिशय गडद होतो.
पावशा :
पावशा पक्षी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच आकाशात मनसोक्त घिरट्या मारताना दिसतात. जणू काही पावसाने कुठे कुठे पडले पाहिजे याचा ते सर्व्हे करत असावेत. पावशा पक्षात दोन प्रकार आहेत. पहिला पावशा पक्षी ‘पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’, अशी साद घालतो तर दुसरा वादळी पावशा पक्षी महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर येऊन पावसाच्या आगमनाची सूचना देतो. या पक्ष्यांचे थवे समुद्रावरून किनाऱ्यावर आले की पावसाची व वादळाची सूचना मिळते. वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागले, की पाऊस पडणार याचे नक्की संकेत मिळतात. त्यावेळी मच्छीमार आपल्या बोटी, जहाने समुद्रात नेत नाहीत. अशा वेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते.
तित्तीर पक्षी –
शेतात, माळरानात अंगावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे सांकेतिक स्वरात ओरडू लागले, की आता हमखास पाऊस येणार, असे समजावे.
वादळी पक्षी :
वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागले की पाऊस पडणार याचे नक्की संकेत मिळतात. त्यावेळी मच्छीमार आपल्या बोटी, जहाजे समुद्रात नेत नाहीत.
कावळ्याचे घरटे :
खेकडे :
तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसले, तर त्यांच्या मार्गात पूर्वसूचना असते. त्यांच्या समुद्राकडे जाण्याने बळीराजाला पावसाचे संकेत मिळतात.
काळ्या मुंग्या :
हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.
वाळवी झाडे पोखरणाऱ्या वाळवीला कधी पंख फुटत नाहीत. मात्र, पावसाळ्यापूर्वी वारुळातून थवेच्या थवे हजारांच्या संख्येने बाहेर पडू लागले की, पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात.
मासे :
पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंड्यांतील पिले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याच्या उत्तर नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट कल्पना माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
दुष्काळ, कमी पावसाचे संकेत –
बिब्ब्याच्या झाडाला बहर येणे, हे दुष्काळाचे संकेत मानले जाते. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्यावर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो. बिचुलाचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीची हाक देतो. वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.
—————————————————————————————————-