मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने जीएसटी (GST) कर भरण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे जीएसटी धारकांना कर भरताना स्वतः उपस्थित राहून बायोमेट्रीक पद्धतीने खातरजमा करावी लागणार आहे. राज्याचे अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
राज्यात वाढत असलेल्या जीएसटी फसवणूक, बनावट पॅन कार्ड द्वारे नोंदणी आणि सायबर क्राइमच्या घटनांवर आळा घालण्यासाठी हे धोरण राबवले जात आहे. ” बायोमेट्रीक पुरावे दिल्याशिवाय जीएसटी भरता येणार नाही,” असे जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले.
या नव्या कार्यपद्धती अंतर्गत, राज्यभरात डेडिकेटेड बायोमेट्रीक केंद्रे उभारली जाणार असून जीएसटी नोंदणीसाठी आधार व बायोमेट्रीक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारकडून फील्ड व्हिजिट्सचीही व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून प्रत्यक्षात व्यापार सुरू आहे की नाही, हे पडताळता येईल.
राज्य सरकारचा दावा आहे की या नव्या प्रणालीमुळे जीएसटीच्या माध्यमातून होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा बसेल आणि गरीब किंवा सामान्य व्यावसायिकांची फसवणूक होणार नाही, याची खात्री राहील. महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरत आहे जे जीएसटी प्रणालीत बायोमेट्रीक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे.
हा निर्णय लागू करण्यासाठी शासनाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. करदात्यांनी नवीन प्रणालीसाठी सज्ज राहावे आणि आवश्यक ती माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————————————————————————