बिहार देशातील पहिले ई-मतदान सुरू करणारे राज्य

‘e-SECBHR’ ॲपद्वारे नोंदणीला सुरुवात

0
111
Google search engine

पाटणा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

भारताच्या निवडणूक इतिहासात एक नवा अध्याय सुरू करत, बिहार हे ई-मतदान सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी ही ऐतिहासिक घोषणा केली. आज शनिवारी  पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये ई-मतदानाची पथदर्शी अंमलबजावणी होत आहे.

ई-मतदानाची सोय कोणासाठी ?
या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काही विशिष्ट मतदार गट निश्‍चित केले आहेत
  • ज्येष्ठ नागरिक

  • दिव्यांग व्यक्ती

  • गरोदर महिला

  • स्थलांतरित मतदार

या गटांतील मतदारांना मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी ते मोबाईलवरून घरबसल्या मतदान करू शकणार आहेत.
‘e-SECBHR’ ॲपद्वारे मतदान
या योजनेअंतर्गत सी-डॅक या केंद्र सरकारच्या संस्थेने विकसित केलेले ‘e-SECBHR’ ॲप वापरण्यात येत आहे. हे ॲप सध्या फक्त अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध असून, त्याचा वापर करताना काही अटी लागू आहेत
  • मतदारांनी ॲप डाऊनलोड करून तो आपल्या मतदार यादीतील नोंदणीकृत फोन नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे.
  • एका मोबाईल नंबरवर फक्त दोन नोंदणीकृत मतदारांनाच लॉगिन करता येईल.
  • मतदाराचे ओळखपत्र पडताळणी झाल्यावरच मतदानाची परवानगी दिली जाईल.
मोबाईल नाही ? तरीही चिंता नाही

ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन किंवा इंटरनेट सुविधा नाही, त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून मतदानाची सोय करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे मोबाईल वापरण्याची अडचण असलेल्या मतदारांनाही संधी मिळणार आहे.

“ई-मतदानाच्या माध्यमातून तांत्रिक सुधारणांचा उपयोग करून मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी स्पष्ट केले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यभर आणि देशभरात ही सुविधा लागू करण्याची शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. लोकशाही प्रक्रियेला सुलभ, सुरक्षित व आधुनिक स्वरूप देण्यासाठी बिहारचे हे पाऊल ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

———————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here