Google search engine

प्रसारमाध्यम प्रतिनिधी  :

मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या एक ते दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं मोठं भाकीत वर्तवलं आहे. ज्यांची अनेक राजकीय भाकितं याआधी खरी ठरली आहेत, त्या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असल्याचं चित्र दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसल्याचं बोललं जात आहे. यामुळेच शिंदे गटाकडून अनेकदा उघड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी तर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची घटना घडली होती. या घटनेची राज्यभर जोरदार चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली. आता या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची ताकद दाखवून दिली आहे. भाजप महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचं सांगत होतं, मात्र आता त्यांना माघार घ्यावी लागली आहे. युती करून निवडणुका लढू असं भाजप म्हणत आहे. यामागे एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे.”

ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या बाजूने वळवलं. अमित शाह यांसारख्या नेत्यालाही शिंदे यांनी ‘खिशात घातलं’ ही त्यांची किमया आहे. त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार आहेत.”

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न केल्याचा हा राजकीय बदला असू शकतो, असंही आंबेडकर यांनी सूचित केलं. “येत्या एक-दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं मला वाटतं,” असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, शरद पवार यांच्याबाबतही बोलताना आंबेडकर म्हणाले, “शरद पवार हे चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. त्या बैठकीतून शिंदे यांनी योग्य राजकीय संदेश दिला आहे.”

या भाकितामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता-समीकरणांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here