कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. मे महिना सुरू झाल्यानंतरही निधी जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, आता एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते एकत्रित म्हणजे ३,००० रुपये एकावेळी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला होता. त्यामुळे यंदाही सरकार एप्रिल आणि मे महिन्याचे १५००-१५०० रुपये एकत्र देणार असल्याची चर्चा आहे. सध्या राज्यातील २ कोटी ४७ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. त्या सर्वजणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
लाडकी बहीण योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. या योजनेतून दरमहा १५०० रुपयांची मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.
जुलै २०२४ पासून आतापर्यंत एकूण नऊ हप्ते वितरित करण्यात आले असून, एप्रिल आणि मे चा हप्ता एकत्र दिल्यास तो दहावा हप्ता ठरेल. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थीं सरकारकडून स्पष्ट तारखेची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
काही महिलांना मिळणार ५०० रूपये ?
ज्या लाडक्या बहिणी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत. खरेतर, लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या वर्षी दोन महत्त्वाचे जीआर निघाले होते. याच संदर्भातील शासनाच्या २८ जून व ३ जुलै २०२४ रोजीच्या निर्णयानुसार, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना १५०० रुपये दिले जातात, तर जे लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांना फरकाची रक्कम मिळणार.
यानुसार आता एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून राज्यातील सुमारे ७.७४ लाख महिलांना ५०० रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. मंडळी, या योजनेने महायुतीच्या निवडणूक विजयात मोलाचा वाटा उचलला आहे,
विधानसभेत या योजनेच्या जोरावर महायुतीने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. पण आता निवडणुकीनंतर दुसऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ कमी करण्यात आला असून यामुळे महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
—————————————————————————————–



