कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील आधार केंद्र चालकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या मागणीनंतर आता सरकारने नवीन अद्ययावत आधार संच उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आधार नोंदणी नंतर मिळणाऱ्या मानधनातही लक्षणीय वाढ जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई शहर व उपनगरातील केंद्र चालकांना नुकतेच हे कीट वितरित करण्यात आले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या आधार संचाचे सुपूर्ती सत्र पार पडले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच अन्य संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
मानधन वीस रुपयावरून थेट पन्नास रुपयापर्यंत :
आधार केंद्र चालकांना प्रत्येक आधार नोंदणीसाठी केवळ २० रुपये मानधन मिळत होते. मात्र, त्यात वाढ करून ५० रुपये प्रती नोंदणी करण्यात आले आहे. म्हणजेच प्रत्येक आधार नोंदणी मागे केंद्र चालकाला आता 30 रुपये अधिक मिळणार आहेत.ही वाढ केवळ आर्थिक सवलत नाही तर डिजिटल सेवांची गुणवत्ता आणि केंद्रचालकांची प्रेरणा वाढवण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे.
१२.८ कोटी आधार नोंदणी पूर्ण :
राज्यातील एकूण १२ कोटी ८० लाख आधार नोंदण्या पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे शून्य ते पाच वयोगटातील एकोणचाळीस टक्के आधार नोंदणी यामध्ये पूर्ण झाली आहे. केंद्र चालकाकडून उर्वरित अपूर्ण नोंदण्या पूर्ण करण्यासाठी नवे संच व वाढीव मानधन उपयुक्त ठरणार आहे.
———————————————————————————–