कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील ‘वनतारा प्राणी संवर्धन केंद्रा’त हलविण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे नांदणीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली महादेवी आता गावात नसल्यामुळे ग्रामस्थांच्या भावनांचा पूर उसळला आहे. मात्र या निर्णयामागे केवळ हत्तीणीच्या आरोग्याची नव्हे, तर आर्थिक स्वार्थाची कथा दडलेली असल्याचा गंभीर आरोप आता मराठी अभिनेते किरण माने यांनी केला आहे.
भावनेशी जीवघेणा खेळ खेळला गेला !
किरण माने यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टमध्ये थेटपणे वनतारा प्रकल्प, पेटा संस्था आणि शासन यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिलंय, ” एका मुक्या जीवाच्या भावनेशी लै जीवघेणा खेळ खेळला गेलाय. ‘वनतारा’ वाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यांना दोनच हत्तीणी पसंत पडल्या. एक केरळची, एक नांदणीची. केरळने नकार दिला… मग हे व्यापारी नांदणीत आले. सौदा करायचा प्रयत्न झाला. पैशांचं आमिष दिलं गेलं, पण गावकऱ्यांनी नकार दिला.”
पेटा नावाच्या पात्राची एन्ट्री आणि ‘ड्रामा’ ची सुरूवात
माने यांनी म्हटलं आहे की, ” या स्टोरीत ‘ड्रामा’ आला तेव्हा ‘पेटा’ नावाचं पात्र अचानक प्रकट झालं. त्यांच्या डॉक्टरांनी महादेवी हत्तीणीची तपासणी केली आणि ती आजारी आहे, तिच्यावर अत्याचार होतोय, असा आरोप केला. त्यानंतर नांदणीच्या ग्रामस्थांनी स्वतःचा डॉक्टर बोलावला आणि त्याने स्पष्ट सांगितलं की महादेवी पूर्णपणे निरोगी आहे.”
“पैशापुढे सगळे झुकले…”
किरण माने यांनी पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, ” पैशापुढं सरकार पासून न्यायव्यवस्थेपर्यंत सगळे झुकले. नांदणीच्या जिव्हाळ्याची हत्तीण अशा पद्धतीनं हिसकावून नेणं, हा अन्याय आहे.”
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी मोठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. अवघ्या २४ तासांत तब्बल २ लाख ४ हजार ४२१ नागरिकांनी आपल्या भावना नोंदवल्या आहेत.
वनतारा टीमची भेट आणि आशेची पालवी
गुजरातमधील वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी व त्यांच्या टीमने नुकतीच नांदणीला भेट दिली. या भेटीनंतर महादेवीला पुन्हा गावात परत आणता येईल का, यावर गावकऱ्यांत नवी चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्याच वेळी, ” ही भेट केवळ औपचारिकता होती की प्रत्यक्ष निर्णयासाठी पावलं उचलली जात आहेत?” असा संशयही व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण प्रकरणात आता न्यायाची आणि संवेदनशीलतेची कसोटी लागली आहे. एकीकडे वनसंवर्धन आणि प्राणी कल्याणाचे मुद्दे आहेत, तर दुसरीकडे नांदणीच्या ग्रामस्थांच्या भावना, संस्कृती आणि एक मुक्या जीवावरचं नातंही आहे. पुढचा निर्णय सरकार काय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————