प्रसारमाध्यम : दिग्विजय माळकर
ब्लॉकचेनमुळे फसवणुकीला आळा; साताऱ्यातील प्रायोगिक प्रयोग यशस्वी
राज्यातील मालमत्ता व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुढील सहा महिन्यांनंतर दस्त नोंदणी क्रमांकाच्या आधारेच बँकांकडून कर्ज मिळणे शक्य होणार असून, यासाठी ई-प्रमाण पोर्टलवर दस्त संरक्षित केले जाणार आहेत. बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता तपासता येणार असल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष बँकेत जावे लागणार नाही.
या नव्या प्रणालीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दस्तासंदर्भातील सर्व कार्यवाहीची नोंद सुरक्षितरीत्या ठेवली जाणार आहे. एकाच मालमत्तेवर दोन वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेण्यास आळा बसेल. तसेच दस्ताशी संबंधित संपूर्ण इतिहास उपलब्ध राहणार असल्याने मालकांची फसवणूक टळणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रायोगिक उपक्रम सातारा जिल्ह्यात राबविला असून तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता ही प्रणाली राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने नोंदविलेले सर्व दस्त विभागाच्या पोर्टलवर संरक्षित केले जाणार असून, ब्लॉकचेन प्रणालीत टाकून पुढील सर्व व्यवहारांची नोंद ठेवली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. साताऱ्यातील यशानंतर येत्या सहा महिन्यांत राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे.
दरम्यान, बँकेकडून कर्ज दिल्यानंतरची नोंद, मालकी हक्कात बदल झाल्यानंतर सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकातील फेरफार, तसेच मालमत्ता वादग्रस्त झाल्यास बँक किंवा तपास यंत्रणांकडून येणारी टाच यासारख्या सर्व बाबींची नोंद ब्लॉकचेनमध्ये केली जाणार आहे. दस्तामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचीही नोंद होणार असल्याने गैरवापर रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे मालमत्ता व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





