प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
आता मोबाइल नंबरप्रमाणेच बँक खातेही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ‘पोर्ट’ करता येणार आहे. ग्राहकांना अधिक सुविधा आणि स्पर्धात्मक सेवा मिळाव्यात यासाठी बँक खाते पोर्टेबिलिटीची नवी संकल्पना पुढे येत आहे. यामुळे ग्राहकांना आपले खाते क्रमांक न बदलता बँक बदलण्याची सुविधा मिळणार आहे.
सध्या बँक खाते बदलणे ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. खाते बंद करणे, नवीन खाते उघडणे, ऑटो-डेबिट, ईएमआय, पगार खाते, वीज-पाणी बिल यांसारख्या सेवांमध्ये बदल करणे आवश्यक असते. त्यामुळे अनेक ग्राहक बँक बदलण्याचा विचार टाळतात. मात्र, पोर्टेबिलिटीमुळे ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.
या उपक्रमामध्ये ग्राहकांचा खाते क्रमांक कायम राहील आणि केवळ बँक बदलली जाईल. त्यामुळे व्यवहारांमध्ये अडथळे येणार नाहीत. तसेच, ग्राहकांना चांगल्या सेवा, कमी शुल्क आणि अधिक डिजिटल सुविधा देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
ही सुधारणा तत्काळ लागू केली जाणार नाही. आरबीआय आंतरराष्ट्रीय पेमेंटला गती देणे, फसवणुकीसाठी बँकांची जबाबदारी निश्चित करणे या सुधारणांवरही काम करत आहे
ग्राहकांना याचा कसा फायदा होईल ?
सर्वात मोठा फायदा हा होईल की तुम्हाला चांगले व्याजदर, कमी शुल्क आणि उत्तम डिजिटल सेवा देणारी बैंक सहजपणे निवडता येईल.
सर्व येणारी आणि जाणारी पेमेंट २ एकाच जागेवरून पाहता येतील. ऑटोमेटेड मैडेटमुळे ईएमआय डिफॉल्ट, एसआयपी थांबणे आणि विलंब शुल्क यांसारखे धोके कमी होतात. एका युनिफाईड डॅशबोर्डच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची सर्व पेमेंट एकाच ठिकाणी पाहता येतील. यामुळे आर्थिक नियंत्रण सुधारेल. ग्राहकांना डिजिटल पेमेंटवर अधिक नियंत्रण मिळेल. यात पेमेंट पद्धती चालू/बंद करणे सोपे होईल.
आरबीआय आणि संबंधित संस्थांकडून या प्रणालीसाठी आवश्यक तांत्रिक आणि नियामक सुधारणा केल्या जात आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि पारदर्शक बँकिंग अनुभव मिळेल.






