कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील फुलउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत प्लास्टिक व कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचा मोठा लाभ फुल उत्पादक शेतकऱ्याना होणार आहे.
कोणताही सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, आनंदाचा कार्यक्रम असो, सजावटीसाठी फुलांचा, फुलांच्या माळांचा, पुष्प गुछाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फुल, आपुलकी, प्रेम, सद्भावना याचे प्रतिक आहे. यामुळे कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात फुलांचा वापर आवर्जून केला जातो. विशेषत: नवरात्रोत्सव, दिवाळी, तुळशी विवाह, गणेशोत्सव या सण व उत्साहात फुलांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे फुलांना मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र मागील सहा-सात वर्षापूर्वी फुल व्यवसायातही प्लास्टिकने प्रवेश केला. माळा, तोरणे, गुछ यामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. प्लास्टिकच्या या वस्तूंचा वर्षानुवर्षे वापर केला जातो. या वस्तु दिसायलाही आकर्षक असतात. शिवाय हाताळायलाही सहजसोपे आहेत म्हणून माळा, तोरणे, गुछ या प्लास्टिक वस्तूंचा वापर फार मोठ्या प्रामाणात वाढला. याचा परिणाम म्हणून फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले. निशिगंध, गलांडा, झेंडू, शेवंती या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने प्लास्टिकची अशाच प्रकारचे सजावटीचे साहित्य बनविले जाते. यामुळे अशां फुलांना गेल्या काही वर्षापासून मागणी घटली आहे. दरही कोसळले आहेत. गतवर्षी झेंडू, गलांडा यांचा दर जास्तीत जास्त ९० रुपये किलो होता. याचा फार मोठा फटका फुल उत्पादकाना गेल्या काही वर्षापासून बसत आहे. याची दखल घेऊन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी प्लास्टिक व कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
गोगावले म्हणाले, प्लास्टिक व कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीवर परिणाम होतो आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी हा निर्णय आवश्यक होता. राज्यात दरवर्षी हजारो शेतकरी गुलाब, झेंडू, शेवंती यांसारख्या फुलांची शेती करतात. मात्र, प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे त्यांना आपली उत्पादने विकणे कठीण झाले आहे.
प्लास्टिक व कृत्रिम फुलांवर बंदी लागू करण्याचा उद्देश राज्यातील नैसर्गिक फुलउत्पादनाला चालना देणे आणि शेतकऱ्यांना न्याय्य बाजारपेठ मिळवून देणे हा आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास मिळेल आणि त्यांच्या उत्पादनांना चांगला दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारकडून बंदीची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून, यासंबंधीचे आदेश लवकरच जारी करण्यात येतील असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले.
——————————————————————————————————






