देहू : प्रसारमाध्यम न्यूज
देहूची वारी आली की सगळ्या वारकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात त्या रिंगणाकडं. तिथं धावतो एक खास अश्व तो म्हणजे बलराज ! अकलूजचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा हा देखणा अश्व यंदाही तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पताका घेऊन रिंगणात धावायला निघालाय. आजच तो वारीसाठी देहूकडं रवाना झाला.
हा काही उगाच घोडा नाही बरं ! गेली पाच वर्षं हा बलराज रिंगणात धावतच आलाय. याच्या आधीही मोहिते पाटलांचा घोडा वारीत असायचाच. ही परंपरा ४० वर्षांपासून सुरू आहे. सुरुवात केली होती दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटलांनी, आता त्यांच्या पावलांवर चालत धवलसिंह आणि त्यांच्या आई पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी ती सेवा पुढं चालवलीय.
बलराज हा मारवाड जातीचा अल्बक अश्व. डोळ्यात तेज, अंगावर थाट, आणि मनात भक्तिभाव ! हजारो लोकांच्या गर्दीतही शांत राहत असेल तर समजून घ्या घोडा नाही, हा तर अनुभवी सेवेकरी आहे.
रिंगणासाठी त्याला वर्षभर खास ट्रेनिंग दिलं जातं. त्यात चालणं, वळणं, गर्दीत संयम राखणं आणि धावताना पताका नीट सांभाळणं याचं रीतसर शिक्षण मिळतं. त्याच्यासाठी खुराकही खासच हरभरा, गूळ, दूध, तूप, गव्हाचा भुस्सा हे तर रोजचंच. पण वारी जवळ आली की त्याला दिलं जातं शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त खाद्य म्हणजे ताकद आणि तंदुरुस्ती दोन्ही टिकून राहतात.
वारीत बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच बलराजला पताकाधारी अश्व म्हणून मान मिळालाय. यंदाही तो देहूपासून पंढरपूरपर्यंतच्या पालखी सोहळ्यात भक्तांच्या नजरेत राहणार.
वारीच्या रिंगणात जो धावतो, त्याच्यात श्रद्धा असते, भक्ती असते, आणि थोडीशी उर्मीही ! बलराज मध्ये हे सगळं भरून राहिलंय. म्हणूनच, यंदाही तो धावताना पाहायला भाविकांची नजर त्याच्यावरच खिळून राहणार, हे नक्की !
————————————————————————————-