मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी आज (ता.१४) अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे. तसेच उद्याचा चक्काजाम आंदोलनही रद्द केलं आहे. परंतु राज्य सरकारने मागण्या मान्य करत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर २ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट देत बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. यावेळी सरकारकडून लेखी स्वरुपात आश्वासन दिले गेले असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
सरकारने दिलेल्या आश्वासनांनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत :
-
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात येत्या पंधरा दिवसांत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल.
-
थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती दिली जाईल. तसेच, नवीन कर्ज वितरणासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
-
दिव्यांगांच्या मानधनामध्ये येत्या ३० जून रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात वाढ करण्यात येईल.
-
इतर उर्वरित मागण्यांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.

बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन करत आहोत. शेतकरी हितासाठी सर्वपक्षातले मला साथ देत आहेत. शेतकरी आणि दिव्यांग या ठिकाणी बसून आंदोलन केले आहे. १,५०० रुपयांमध्ये त्यांची गरज भागत नाही. आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घ्यावे. तोडगा निघाला नाहीतर आम्ही २ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढू. आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.
—————————————————————————————






