अमेरिका : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वैद्यकीय जगतात अलीकडच्या काळातील सर्वात थरारक घटना समोर आली आहे. ओहायो येथील लिंडसे आणि टिम पियर्स या दांपत्याच्या पोटी नुकतंच बाळ जन्माला आलं आहे. पण, हे बाळ तसंच सामान्य नाही. या बाळाचा गर्भ तब्बल ३० वर्षांपूर्वी गोठवण्यात आला होता.
थॅडियस डॅनियल पियर्स असं या बाळाचं नाव असून, त्याचा जन्म २६ जुलै २०२५ रोजी झाला आहे. पण विशेष बाब म्हणजे या बाळाचा गर्भ १९९४ सालीच तयार करण्यात आला होता आणि तब्बल तीन दशकं फ्रोजन अवस्थेत आयव्हीएफ सेंटर मध्ये सुरक्षित ठेवण्यात आला होता. थॅडियस आता जगातील सर्वाधिक काळ गोठवण्यात आलेल्या गर्भातून जन्मलेलं बाळ ठरलं आहे.
विक्रमासाठी नव्हे, मूल हवे होते – आई लिंडसे
थॅडियसच्या आई लिंडसे पियर्स (३४) हिने या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं, “आम्हाला सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटलं. आम्ही फक्त मूल हवं होतं, विक्रम मोडायचा आमचा हेतू नव्हता.” सात वर्षांपासून अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असलेल्या या जोडप्याला अखेर आयव्हीएफच्या माध्यमातून थॅडियसच्या रूपाने पालकत्व लाभलं.
३० वर्षांची बहीण आणि १० वर्षांची पुतणी !
थॅडियसच्या जन्माची कहाणी जितकी वैज्ञानिकदृष्ट्या विलक्षण आहे, तितकीच ती भावनिक व गुंतागुंतीची आहे. थॅडियसची बहीण सध्या ३० वर्षांची असून तिची मुलगी १० वर्षांची आहे. हे कसं शक्य?
तर, १९९४ मध्ये लिंडा आर्चार्ड नावाच्या महिलेनं तिच्या माजी पतीसोबत आयव्हीएफ उपचार घेतले होते. त्यावेळी चार भ्रूण तयार करण्यात आले होते. त्यातील एक प्रत्यारोपित करून तिने मुलीला जन्म दिला हीच मुलगी थॅडियसची बहीण. उरलेले तीन भ्रूण गोठवून ठेवण्यात आले. यातीलच एक भ्रूण तब्बल तीस वर्षांनी लिंडसेच्या गर्भात रोवण्यात आला, आणि त्यातून थॅडियसचा जन्म झाला.
ही घटना फक्त एक कौटुंबिक गाथा नाही, तर वैद्यकीय जगात भ्रूण संरक्षण व पुनर्जीवनाच्या तंत्रज्ञानातील कमालीची प्रगतीचं उदाहरण आहे. इतक्या दीर्घकाळानंतरही भ्रूण जिवंत राहतो आणि त्यातून निरोगी बाळ जन्माला येतं, हे अनेक शास्त्रज्ञांनाही थक्क करणारं आहे.
या घटनेनं भविष्यातील अपत्य प्राप्तीच्या नव्या शक्यता खुल्या केल्या आहेत. एखाद्या जोडप्याला वेळेवर मूल न झाल्यास, किंवा नंतर मूल हवं असल्यास अशा गोठवलेल्या भ्रूणाचा उपयोग करून संधी मिळू शकते. विज्ञान, नियती आणि मानवतेच्या अनोख्या संगमाची ही कथा – थॅडियस डॅनियल पियर्सच्या जन्मामुळे पुन्हा एकदा मानवतेच्या शक्यतांची व्याख्या विस्तारली आहे.
——————————————————————————————