नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
बी. सुदर्शन रेड्डी – इंडिया आघाडीनं माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे की, इंडिया आघाडी देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करते आणि ज्यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहात संख्याबळ आहे. मला वाटतं मी देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेन. मी एनडीएच्या सर्व पक्षांना आवाहन करतो की त्यांनी मला पाठिंबा द्यावा.”
काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सर्व पक्षांच्या सहमतीनं रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी आम आदमी पक्षानेही या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं. आघाडीची इच्छा आहे की सुदर्शन रेड्डी हे संपूर्ण विरोधकांचे एकमुखी उमेदवार ठरावेत.
निवडणूक कार्यक्रम – उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर मतदान ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
भाजपच्या खेळीला प्रत्युत्तर
भाजपने नुकतीच दक्षिण भारतातील वरिष्ठ नेते सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केलं होतं. यामागे तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा ( मार्च-एप्रिल २०२६ ) विचार असल्याचं मानलं जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंडिया आघाडीनं देखील दक्षिण भारतातूनच आपला उमेदवार दिला आहे. या निर्णयामुळे आंध्र प्रदेशातील टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.
कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी ?
-
जन्म : ८ जुलै १९४६
-
शिक्षण : बी.ए., एल.एल.बी.
-
१९७१ : मध्ये आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून नोंदणी
-
१९८८-९० : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील
-
१९९० : केंद्र सरकारचे वकील (सहा महिने)
-
उस्मानिया विद्यापीठासाठी कायदेशीर सल्लागार व स्थायी वकील
-
२ मे १९९५ : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
-
५ डिसेंबर २००५ : गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
-
१२ जानेवारी २००७ : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
-
८ जुलै २०११ रोजी न्यायसेवेतून निवृत्ती
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी माजी न्यायमूर्तींना उमेदवारी देत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पुढील काही दिवसांत या निवडणुकीची लढत अधिक रंगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
—————————————————————————————————