कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जेवणाच्या ताटात पदार्थ समोर आल्यानंतर अनेक लोकांना लगेच वरून मीठ टाकण्याची सवय असते. ही सवय किती हानिकारक ठरू शकते, याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. जेवणात आधीच योग्य प्रमाणात मीठ असतानाही, चव न पाहता त्यावर वरून मीठ टाकणं ही एक ‘अविचारी सवय’ बनली आहे. मात्र, ही सवय आपल्या हृदयाच्या, किडनीच्या आणि संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
मीठाचं प्रमाण आणि शरीरावर परिणाम
एका दिवशीच्या आहारात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ टाळावं, असं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) मत आहे. पण भारतीय आहारात आणि विशेषतः वरून मीठ टाकण्याच्या सवयीमुळे हे प्रमाण सहजपणे ओलांडलं जातं. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, किडनीच्या समस्या आणि पाणी साठवण (water retention) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आहारात वरून मीठ टाकण्याची सवय लहानपणापासून किंवा पालकांच्या निरीक्षणातून लागते. काही लोकांना वाटतं की वरून मीठ टाकल्यामुळे चव अधिक खुलते, तर काहींना ते ‘संपूर्ण जेवण’ असल्याचं एक संकेत वाटतो. मात्र, वेळोवेळी शरीरात अनावश्यक मीठ जात राहिलं, तर त्याचा विपरित परिणाम होतो.
आहारतज्ज्ञ डॉ. शैलेश देशमुख म्हणतात, “कृत्रिम चव वाढवण्यासाठी आपण जेव्हा जेवणात अजून मीठ घालतो, तेव्हा आपण नकळत आपल्या शरीरावर दीर्घकालीन धोका ओढवून घेतो. या सवयीवर नियंत्रण ठेवणं आज आवश्यक आहे.”
आहातज्ज्ञ फारेहा शानम आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पदार्थावर वरून मीठ टाकलं तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लठ्ठपणा निर्माण होऊ शकतो. तसेच हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ सेवन करतात. तरुणांचे दररोज सोडियमम सेवन करण्याचे प्रमाण हे ४३१० मिलीग्राम असून ते १०.७८ ग्र्याम मीठाच्या बरोबर आहे. खरं तर एका तरुणाने दिवसाला २ हजार मिलीग्र्यामपेक्षा कमी मीठ खाल्लं पाहीजे. हे मीठ एक चमच्याचा बरोबरीने आहे.
मिठाचे जादा सेवन कसे टाळावे:
चव पाहूनच मीठ घालावं: जेवण सुरू करण्यापूर्वी पदार्थ चाखावा आणि मीठाची गरज आहे का, याचा अंदाज घेऊनच मीठ टाकावे.
मीठ टाकणं टाळण्यासाठी टेबल सॉल्ट काढून ठेवा: टेबलवर ठेवलेलं मीठ सहजपणे वापरलं जातं. तेच काढून ठेवलं, तर टाकण्याची शक्यता कमी होते.
लो-सोडियम पर्याय वापरा: गरज असेल, तर कमी सोडियम असलेले मीठ वापरावे.