कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उत्तराखंडमधील धराली गावावर कोसळलेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाने कधीही काहीही होऊ शकते पर्वतीय प्रदेशात सध्या जास्त धोका आहे. जीव संकटात घालण्यापेक्षा पर्वतीय प्रदेशात जाणे टाळा असे आवाहन पर्यटकाना केले आहे.
उत्तराखंडमध्ये हवामान विभागानं अतिदक्षतेचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड राज्यातील अनेक नद्यांचा जलस्तर प्रचंड प्रमाणात वाढला असून, नद्यांनी रौद्र रूप धारण केलं आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
गंगा, यमुना, मंदाकिनी यांसारख्या प्रमुख नद्यांचे पाणी नदीपात्राबाहेर जाऊ लागल्याने जवळपासच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनानं सतर्कता बाळगत अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकं, स्थानिक पोलिस, व एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक) यांच्या मदतीनं बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
याशिवाय, सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ भागांत भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद पडले असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रुद्रपुर, उधम सिंह नगर, चंपावत, नैनीताल, पिथौरागढ़, अल्मोड़ा, बागेश्वर, उत्तरकाशी आणि पौडी गढवाल हे अतिशय संवेदनशील भाग असून पर्यटकानी या भागात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.