कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दुर्गराज रायगडाच्या स्थापनेबाबतच्या शास्त्रोक्त दृष्टिकोनाला ठोस पुरावा मिळाला असून, नुकत्याच पार पडलेल्या पुरातत्त्व उत्खननात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण खगोलशास्त्रीय उपकरण ‘सौम्ययंत्र’ (Astrolabe) सापडले आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन मोहिमे दरम्यान हे उपकरण सापडल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
सौम्ययंत्र हे एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण असून, भौगोलिक दिशा, ग्रह-ताऱ्यांचे स्थान, वेळ आणि कालगणना यासाठी याचा उपयोग केला जात असे. हे उपकरण गडावर आढळल्यामुळे रायगडाची रचना केवळ स्थापत्यदृष्ट्या नव्हे, तर वैज्ञानिक व खगोलशास्त्रीय पद्धतींचा विचार करून केल्याचे सिद्ध होते.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विज्ञान, तंत्रज्ञान व खगोलशास्त्र यांना दिले गेलेले महत्त्व यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होते. सौम्ययंत्राच्या मदतीने रायगडाचा भूआकार, महालांची मांडणी, दिशाभान, सुरक्षा व्यवस्था यामध्ये अचूकता राखली गेल्याचे संशोधकांचे मत आहे. हा ऐतिहासिक शोध भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणार असून, रायगडचा ऐतिहासिक व वैज्ञानिक वारसा अधिक ठोसपणे समोर येण्यास मदत होणार आहे. रायगडाला लाभलेल्या दुर्गवैशिष्ट्यांची पुनर्मूल्यांकन प्रक्रियेलाही आता वेग येणार आहे.
पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सौम्ययंत्राचा शोध हा केवळ एक उपकरण सापडल्याचा विषय नसून, तो त्या काळातील अभियांत्रिकी आणि खगोलशास्त्राच्या प्रगततेचा ठोस पुरावा आहे. रायगडाच्या स्थापनेमागील शास्त्रीय दृष्टिकोन आता सिद्ध होत आहे.”
प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे ‘Astrolabe’. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.
भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की, रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास १० ते १२ ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता, त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र (Astrolabe) खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.
या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव / साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. या वरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
——————————————————————————————-