कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खगोलशास्त्रज्ञ, आयुका संस्थेचे संस्थापक संचालक व विज्ञान लेखक कोल्हापूरचे सुपुत्र जयंत विष्णु नारळीकर यांचे आज (२० मे २०२५) पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. यानिमित्त त्यांना शब्दफुलांची आदरांजली !
अत्यंत गूढ असलेल्या ब्रह्मांडावर जयंत नारळीकर यांनी संशोधन केले. हा अभ्यास करत असताना उकललेल्या नवनवीन बाबी अत्यंत रसपूर्ण मांडत त्यांनी विज्ञान कथा लिहिल्या. विज्ञानाचा वारसा वडिलांच्याकडून तर लिखाणाचा वारसा आईकडून त्यांना मिळाला. त्यांच्या पत्नीही गणितीतज्ञ व लेखिका होत्या. नारळीकर यांनी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्या सहकार्याने हॉयल-नारळीकर सिद्धांत मांडला. हा एक वैकल्पिक ब्रह्मांडशास्त्रीय सिद्धांत होता जो बिग बँग सिद्धांताला पर्याय होता. त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अनेक मूलभूत संशोधन केले.
डॉ. जयंत नारळीकर याचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले.
आयुका संस्थेची स्थापना –
खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे त्यांना जगभरात मान्यता मिळाली. प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले. भारतामध्ये खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी पुणे येथे ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना त्यांनी १९८८ मध्ये केली आणि संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. ही संस्था आज भारतातील प्रमुख खगोलशास्त्र संशोधन केंद्रांपैकी एक मानली जाते.
वैज्ञानिक ज्ञान संपदा –
विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नारळीकरांनी उत्तुंग कामगिरी केली. नारळीकर हे लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके अशा विपुल साहित्य संपदा लिहिली. नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.
नारळीकरांनी ११ जून १९६४ रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा अवघ्या २६ व्या वर्षी सिद्धान्त मांडला होता. त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडल्यानंतर एका रात्रीत नारळीकरांचं नाव घरोघरी पोहोचलं होतं. त्यावेळी ते स्वतंत्र भारतातील विज्ञानजगताचा चेहरा ठरले होते. त्यानंतर १९६५ मध्ये भारतदर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली होती. सरकारकडूनही नारळीकरांची दखल घेण्यात आली होती.
जयंत विष्णु नारळीकर यांचे कार्य व सन्मान –






