दुबई : वृत्तसेवा
आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप – २०२५ स्पर्धेच्या तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, या स्पर्धेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या संघाने भारतात येण्यास स्पष्ट नकार दिल्याने बीसीसीआय संपूर्ण स्पर्धाच युएईत (UAE) आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पाकिस्तानचेच नव्हे, तर संपूर्ण संघांचे सामने यूएईमध्येच खेळवले जाण्याची शक्यता आहे.
स्पर्धेसाठी तात्पुरतं वेळापत्रक तयार करण्यात आलं असून, ५ सप्टेंबर पासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी स्पर्धा टी – 20 स्वरूपात होणार आहे. आगामी टी – 20 विश्वचषक ( २०२६ ) लक्षात घेऊन आशिया कप टी – 20 फॉर्मेटमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या वेळेस २०२३ मध्ये वनडे वर्ल्डकप लक्षात घेऊन आशिया कप वनडे फॉर्मेट मध्ये खेळवण्यात आला होता.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि युएई हे संघ सहभागी होणार आहेत. यातील सर्वात मोठा आणि चर्चेचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील असल्याने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे.
मागील आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारताने ४८.५ षटकांत २६६ धावा केल्या होत्या. त्यानंतर सुपर ४ फेरीत दोन्ही संघ पुन्हा आमने सामने आले. त्या सामन्यात भारताने ३५६ धावांचं प्रचंड आव्हान दिलं आणि पाकिस्तानला २२८ धावांनी पराभूत करत दमदार विजय मिळवला होता.
आता संपूर्ण आशिया कप यूएईत होण्याची शक्यता असल्याने आयोजक, खेळाडू आणि चाहत्यांची तयारी सुरु झाली आहे. बीसीसीआयकडून अंतिम घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, युएईत भरवण्यात येणारी ही स्पर्धा अधिक रोमांचक ठरणार आहे, यात शंका नाही.
———————————————————————————————






