मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण झाला आहे. अधिवेशनासाठी पत्रकारांसह इतर अधिकृत व्यक्तींना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर यंदा राष्ट्रचिन्ह असलेला अशोकस्तंभ गायब असून, फक्त ‘विधानसभा’ किंवा ‘विधान परिषद’ असा मजकूर आहे. याआधीच्या प्रत्येक अधिवेशनात ओळखपत्रांवर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अधिकृत कागदपत्रांप्रमाणे अशोकस्तंभ असायचा.
आता अधिवेशनाच्या ओळखपत्रावरूनही अशोकस्तंभ हद्दपार झाल्याने विरोधकांचा आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. विरोधकांनी यामागे “हिंदुत्ववादी एजेंड्याचं प्रतिकात्मक राजकारण” असल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधला आहे.
“अशोकस्तंभ हे भारतीय प्रजासत्ताकाचं आणि संविधानिक मूल्यांचं प्रतीक आहे. ते अचानक हटवणं म्हणजे संविधानाशी आणि प्रजासत्ताकाच्या प्रतीकांशी खेळ करणं,” अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
याआधीही राजभवनात पार पडलेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात अशाच स्वरूपाचा वाद निर्माण झाला होता. त्या कार्यक्रमाच्या बॅनरवर देखील अशोकस्तंभाऐवजी ‘सेंगोल’ या राजदंडाचं प्रतीक वापरण्यात आलं होतं. त्या घटनेवरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर संविधानिक प्रतीकांमध्ये बदल करण्याचा आरोप केला होता.
दरम्यान, या नवीन प्रकरणावर अद्याप सरकारकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे यासंदर्भातील गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.
————————————————————————————