पंढरपूर : विशेष वृत्तसेवा
पंढरपूरच्या आषाढी वारीची आज सकाळी पारंपरिक आणि भावनिक वातावरणात औपचारिक सांगता झाली. वारीच्या परंपरेनुसार, सर्व मानाच्या संतांच्या पालख्या आज सकाळी गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरासमोर एकत्रितपणे पोहोचल्या. याठिकाणी भाविकांच्या उपस्थितीत गोपाळकाला कार्यक्रम पार पडला.
वारकऱ्यांनी आपापसात प्रेमाने आणि श्रद्धेने एकमेकांना दही, दूध व पोहे वाटले. “गोपाळकाला गोड झाला…” या जल्लोषात आणि हरिनामाच्या गजरात वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. वारीचा थकवा विसरून हजारो भाविक आनंदात सहभागी झाले. गोपाळकाला हा कार्यक्रम वारीच्या एकतेचे आणि भक्तिभावाचे प्रतीक मानला जातो.

गोपाळपूरमध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती. विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांची मांदियाळी येथे एकत्र झाली होती. पारंपरिक पोशाख, टाळ- मृदंगाचा गजर, हरिपाठ आणि अभंगगायन यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.
या कार्यक्रमानंतर दुपारच्या सुमारास सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणार आहेत. मंदिरात प्रवेशानंतर पालख्या श्री विठ्ठलाचे औपचारिक दर्शन घेणार असून, हा क्षण वारकऱ्यांसाठी अत्यंत पावन आणि भावपूर्ण असतो.
पंढरपूर नगरीत सध्या भक्तीचा महासागर भरून राहिला आहे. आषाढी वारीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन, सेवा समित्या आणि स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वारकऱ्यांची शिस्त, भक्ती, आणि सहभाव पाहून साऱ्यांनाच अभिमान वाटतो आहे.
वारीची सांगता झाली असली तरी, भक्तांचे विठ्ठलाशी नाते अबाधित राहते आणि “येईल वर्षा पुढची, असेच घडो वारीत सर्वांचीच भेट घडो” अशा भावनेने वारकरी नव्याने तयारीस लागतात.



