कुरुंदवाड : प्रतिनिधी
धरण पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. यामुळे गुरुवारी सांयकाळपासून वारणा धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी गुरुवारी दिवसभर स्थिर राहिली आहे. तर पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसभरात ३ फुटाने घट झाली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता राजाराम बंधार्याजवळ पाणी पातळी ३० फुट ३ इंच होती, ती सांयकाळी ५ वाजता २७ फुट ४ इंचावर आली आहे. यानुसार पंचगंगेची पाणी पातळी ओसरु लागली आहे. यामुळे नृसिंहवाडी श्री दत्त मंदिरमध्ये आज अपेक्षित असलेला तिसरा दक्षिणद्वार सोहळा झाला नाही.
नृसिंहवाडीजवळ बुधवारी सांयकाळी ४ वाजता पाणी पातळी ३९ फुट ६ इंच होती. ती गुरुवारी सकाळी ७ वाजता ४० फुट ९ इंचावर गेली. ही पाणी पातळी स्थिर राहिली. रात्री फक्त पाणी सव्वाफुट वाढले. धरणातून विसर्ग कमी केल्याने सकाळपासून पाणी किंचीतही वाढले नाही.
दरम्यान रात्री सव्वाफुटाने पाणी वाढल्याने कृष्णेचे पाणी दत्त मंदिराच्या पादुकापर्यंत गेले. मात्र आज- गुरुवारी दिवसभरात पाणी किंचीतही वाढले नसल्याने भाविकांना अपेक्षित असलेला दक्षिणद्वार सोहळा होऊ शकला नाही. शिरोळ तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी अजुनही कोयनेतुन ११४०० क्युसेक, वारणेतून ७९४० क्युसेक व राधानगरी धरणातुन ३१०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरुच आहे.
गुरुवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत राजापुर बंधार्याजवळ पाणी पातळी ३० फुट ४ इंच होती. नृसिंहवाडी जवळ ४० फुट ९ इंच होती. तर कोयना धरणात ७७.४० टीएमसी, वारणा धरणात २८.३४ टीएमसी, अलमट्टी धरणात ९८.७२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
————————————————————————————