कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठी रंगभूमीच्या आकाशात तेजस्वी सूर्याप्रमाणे झळकणारे नाव म्हणजे केशवराव भोसले. ज्यांनी केवळ अभिनय नव्हे तर गायन, दिग्दर्शन, नाटकातील तांत्रिक सौंदर्य, सादरीकरण यांतून नवे मापदंड निर्माण केले. म्हणूनच त्यांना “संगीतसूर्य” आणि “नटसम्राट” अशी दुहेरी उपाधी लाभली. केशवराव भोसले यांचा जन्म कोल्हापूर येथे आजच्याच दिवशी ९ ऑगस्ट १८९० ला झाला. हे मराठी नाट्यसृष्टीतील एक श्रेष्ठ गायक-अभिनेते होते. आज त्यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या एकूण कलेच्या कारकिर्दीचा घेतलेला थोडक्यात आढावा.
केशवराव फक्त चार-पाच वर्षांचे असतानाच वडील निवर्तले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी आईवर आली. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शालेय शिक्षण घेता आले नाही.
नाट्यकलेशी ओळख व पहिल्या भूमिका
आई जनाबाई ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’त स्वयंपाकाचे काम करीत असे. मोठा भाऊ दत्तात्रय व केशवरावही तिच्याबरोबर जात आणि नाट्यकंपनीत वरकाम करीत. त्या वातावरणात रमून दोघांनाही नाट्यकलेची गोडी लागली.
सुरुवातीस केशवरावांना नाटकांतून बालकलाकार म्हणून किंवा स्त्री पात्रांच्या लहान भूमिका मिळत असत. पण १९०२ मध्ये गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा या संगीत नाटकात शारदेची भूमिका करण्याची संधी मिळाली. ही भूमिका त्यांनी इतकी प्रभावी साकारली की एका रात्रीत त्यांचे नाव सर्वत्र गाजले.
यानंतर संगीत सौभद्र मधील सुभद्रा, मृच्छकटिक मधील वसंतसेना या भूमिकांनी त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली.
स्वतःची नाट्यसंस्था आणि नवे प्रयोग
१९०७ मध्ये त्यांनी ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ सोडली आणि १ जानेवारी १९०८ रोजी हुबळी येथे ‘ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ स्थापन केली. त्या काळी नाट्यसंस्था आपल्या जाहिरातींमध्ये आश्रयदात्या संस्थानिकांचा उल्लेख करीत असत; परंतु केशवरावांनी आपल्या संस्थेला ‘लोकाश्रयाखालील संस्था’ असे नाव दिले. नाटकाची निवड करताना ते नेहमी लोकशिक्षणाचा हेतूही लक्षात ठेवत.
सुरुवातीस मंडळीने शारदा, सौभद्र अशी जुनी नाटके रंगमंचावर आणली. पुढे मदालसा (रामचंद्र आत्माराम दोंदे) आणि दामिनी (हिराबाई पेडणेकर) ही नवी नाटके सादर केली; मात्र यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
नंतर वीर वामनराव जोशी यांचे राक्षसी महत्त्वाकांक्षा रंगभूमीवर आले आणि प्रचंड लोकप्रिय झाले. या नाटकात केशवरावांनी मृणालिनी ही स्त्री भूमिका केली होती. दमदार संवाद, कर्णमधुर संगीत, आकर्षक देखावे आणि मखमली पडद्याचा पहिला प्रयोग यामुळे हे नाटक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले.
गायकी व अभिनयाची वैशिष्ट्ये
-
टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज
-
जोरकस, प्रभावी तान आणि भावपूर्ण गायनशैली
-
संवादातील ठसकेबाज फेक
-
रंगमंचावर वेळेवर नाटक सुरू करण्याची शिस्त