अमोल शिंगे : प्रसारमाध्यम डेस्क
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यात विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे. जिथे आवश्यकता नाही त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पण, ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जोतिबा डोंगराच्या सामाजिक इतिहासात मोलाचं योगदान आहे त्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय आणि प्रशासकीय उदासिनता दिसून येत आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचे जोतिबा डोंगरासाठी असणारे योगदान महत्त्वाचे व ऐतिहासिक आहे. त्यांच्या काळात जोतिबा डोंगराचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढले आहे. शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीशी प्रभावित होते आणि बहुजन समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत होते. जोतिबा हे बहुजन समाजाचे कुलदैवत मानले जाते. त्यामुळे शाहू महाराजांनी जोतिबा डोंगराच्या विकासाला सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्व दिले आहे.
जोतिबा डोंगरावरील गुरव समाजाबरोबरच इतर समाजातील सर्व घटकांना जोतिबा मंदिराच्या आणि मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात छत्रपती शाहू महाराजांनी सामावून घेऊन जोतिबा डोंगराचा सामाजिक विकास साधला आहे. पण आत्तापर्यंत जोतिबा डोंगराच्या विकास प्रक्रियेत शाहू महाराजांचं हे बहुमुल्य योगदान दुर्लक्षित केलं गेलं आहे.
सुंदर जोतिबा परिसर विकास समिती आणि ब वर्गांतर्गत मंजूर झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुद्धा शाहू महाराजांचा साधा पुतळा सुद्धा उभा करण्याच्या दृष्टीने साधा प्रयत्नही झाला नाही यावरून राजकीय आणि प्रशासकीय उदासिनता दिसून येत आहे.
” छत्रपती शाहू महाराजांचं जोतिबा डोंगराच्या बाबतीत असणारे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जीवनचरित्राचा इतिहास जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांपुढे उजागर होईल अशा पद्धतीचे त्यांचे एक स्मारक किंवा स्मृतीभवन उभं करण्याच्या दृष्टीकोनातून प्राधिकरणाच्या प्रक्रियेत प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती गरजेची आहे ”
विविध विकासकामे –
श्री. क्षेत्र जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपयांच्या निधीला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यात विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यात जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी १७ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. देवस्थान समिती आणि प्राधिकरणाच्या नवीन कार्यालयासाठी ५ कोटी तर नवे तळे परिसराच्या विकासासाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आशा विविध कामांवर एकूण २५९.५९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काही विकास कामात अनावश्यक खर्च केला जाणार आहे. पण एवढ्या मंजूर झालेल्या निधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जोतिबा डोंगराच्या सामाजिक इतिहासात मोलाचं योगदान आहे त्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही.
—————————————————————————–