लालबुंद रसरशीत गोड सफरचंद म्हणजे कश्मिरी वा हिमाचलचीच ! जसा आंबा आपल्याकडे तसे सफरचंद उत्तर भारतातले ! हो ना ? पण नो मोअर ! “आता सफरचंदे लगडलीत भावा आपल्या यळगूड मधे” व हा बहुमानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवणारा शेतकरी शास्त्रज्ञ आहे अनिल माणगावे. आणि या प्रयोगशील शेतक-याचे शिक्षण किती आहे तर 7 वी. ! कल्पकता, सोशल मेडीयावरून माहिती मिळवण्याचे कसब, हवामानाचा व जमिनीचा अभ्यास यांच्या जोरावर शिक्षणावर मात करीत माणगावे यांनी हे यश मिळवल आहे
सफरचंदाच्या काही जातींना 45 अंश डिग्री सेल्सिअस तपमान चालू शकते हे त्यातूनच त्यांच्या लक्षात आले. या जाती म्हणजे ‘जी 9’ व ‘अण्णा’. या जातींची रोपे त्यांनी अकलूज जवळील दहीगाव येथून मिळवली. या चाणाक्ष शेतक-याने ‘जनरल सेन्स’ वापरून आंतरपिके लागवड करून जमीनेचे तापमान ही राखले.
अनिल माणगावे यांच्याकडे साडे तीन एकर जमीन. त्यातील तीन एकरात ऊस. उरलेले अर्धा एकर प्रयोगाला मोकळे. तीन वर्षापूर्वी त्यांनी या आर्ध्या एकरात 50 सफरचंदाची खड्डे घेवून शेणखताचा वापर करून रोपे लावली. कांदा,लसूण,भुईमूग व शेवगा यांची आंतरपिके घेतली. डिसेंबर मधे पाणी बंद केले. पानगळ झाली. पुन्हा पालवी फुटली.मार्च मधे फळे लागली.
माणगावे यांचे सर्व कुटूंब शेतात राबते. केशर आंबा, चिकू, पेरू ही याच आर्ध्या एकरात घेतात. तीन एकर ऊस व आर्धा एकर मधे बाकी सब. प्रत्येक झाडाला 30-35 सफरचंद. 5 किलो एका झाडापासून. बाजारात सध्या भावच 200-300 रू किलो आहे. 250 किलो 50 झाडांचे उत्पादन. साहजिकच हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत.