मुंबई : विशेष प्रतिनिधी
शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मंत्र्यांना, आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. आपण कमी बोललं आणि जास्त काम केलं तर तेच पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
“विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका. चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण जे मोठं यश मिळवलंय ते चुकीच्या बोलण्याने घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असं काहीही करू नका. आपली कामगिरी अशी असली पाहिजे की त्याची ब्रेकिंग न्यूज व्हावी,” अशा शब्दांत शिंदेंनी सर्वांना सज्जड दम भरला.
शिवसेनेत निवडणुकींची ऐतिहासिक प्रक्रिया
यावेळी शिंदेंनी शिवसेनेत ऐतिहासिक निवडणुकीची घोषणा केली. “शाखाप्रमुखापासून ते मुख्य नेत्यापर्यंत सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाचे सक्रिय सदस्य हेच मतदार असतील. ही निवडणूक पूर्ण पारदर्शक आणि निःपक्षपाती पद्धतीने होणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रिया सात टप्प्यांत पार पडणार असून, त्यात डिजिटल (ऑनलाईन) तसेच प्रत्यक्ष मतदानाचा समावेश असेल. कुणावर नेतृत्व लादण्याचा प्रकार होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
“मी स्वतः पक्षाचा मुख्य नेता असूनसुद्धा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. लोकशाहीत शाखाप्रमुख असो वा मुख्य नेता, सर्वसमान आहेत,” असे सांगत त्यांनी पक्षात नव्या दमाने लोकशाही बळकटीकरणाचा इशारा दिला.
ठळक मुद्दे :
- मंत्र्यांना आणि आमदारांना शिस्तीचा इशारा
- चुकीच्या बोलण्याने पक्षाला अडचणीत आणू नका – शिंदेंचा दम
- केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हावी अशी कामगिरी करा
- शाखाप्रमुख ते मुख्य नेते, सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार
- डिजिटल आणि प्रत्यक्ष मतदानाच्या सात टप्प्यात निवडणूक
- नेतृत्व लादण्याचा प्रयत्न होणार नाही; निवडणूक पूर्ण पारदर्शक
- “मीही निवडणुकीला सामोरा जाणार” – एकनाथ शिंदे
या बैठकीत एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले की, शिवसेना केवळ घोषणा करणारा नव्हे तर कडक शिस्त आणि लोकशाही प्रक्रिया पाळणारा पक्ष ठरेल. यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेतील अंतर्गत राजकारण आणि संघटनबांधणी अधिकच गती घेणार, यात शंका नाही.
—————————————————————————————-