नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्यांच्या उत्तराधिकारी पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहिती नुसार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा आहे
-
नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – २१ ऑगस्ट २०२५
-
नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २५ ऑगस्ट २०२५
-
मतदानाची तारीख – ९ सप्टेंबर २०२५
-
मतमोजणी व निकाल – ९ सप्टेंबर २०२५
धनखड यांनी राजीनामा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विशेष आभार मानले. “प्रकृतीच्या कारणामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी “धनखड यांना उत्तम आरोग्य लाभो,” अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
उपराष्ट्रपतीपदासाठी कोणता चेहरा रिंगणात ?
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर, नव्या उपराष्ट्रपती पदासाठी कोण उमेदवार असणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यंदा बिहारच्या विधानसभेची निवडणूक जवळ आली असल्याने, भाजपाकडून यावेळी उपराष्ट्रपती पदासाठी बिहार मधील कुणा दिग्गज नेत्याची निवड होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपाच्या एका आमदाराने सार्वजनिकरित्या “नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती बनवलं गेलं, तर आनंदच होईल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ठाकूर हे देखील या शर्यतीत असल्याची जोरदार चर्चा आहे.
या निवडणुकीचे राजकीय परिणाम लांबवर जाणारे असतील. सत्ताधारी पक्षाने कोणाला उमेदवार म्हणून घोषित करणार, विरोधक काय भूमिका घेणार, आणि मतदारसंघाच्या समीकरणात कोण बाजी मारणार, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. ९ सप्टेंबरला होणाऱ्या मतदानानंतर भारताला नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राजकीय हालचालींनी गती घेण्याची शक्यता आहे.
———————————————————————————–