त्या खरच जायंट किलर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात एकाच व्यक्तीने ते ही एका सामाजिक कार्यकर्ती महिलेने आपल्या वैयक्तिक लढ्याद्वारे मंत्र्यांची पदे खालसा केली व त्यांना नमते घेऊन राजीनामे द्यायला लावले, अनेक धुरंधर राजकीय नेत्याना गप्प केले असे कधीही घडले नव्हते व कदाचित घडणारही नाही. अंजली दमनियांवर आरोपही काही कमी झाले नाहीत. सत्ताधारी, विरोधी पक्षातील प्रवक्ते, बडे नेते, पक्ष प्रमुख मंत्री, ज्यांची पदे गेली ते मंत्री यांनी बेछूट आरोप केले. अनेक डी फेमेशनचे दावे, एफ आय आर करणेत आले तसेच त्या बी टीमच्या सदस्य आहेत. सुपारीबाज आहेत. त्यांना कोण रीचार्ज करते माहिती आहे. कष्टाच्या पैशानी परदेशात कोठे फिरलात सांगा, त्यांची नारको करा.
अनेक जण अनेक तऱ्हेने बोलले. त्यांचा नंबर सोशल मेडीया वर जाहीर करण्यात आला. रेल्वे मधे डब्यात खट्टीमिठी बाते करण्यासाठी हा नंबर असे लिहिले गेले. झी 24 तास च्या टू द पॉइंट कार्यक्रमात त्यांनी स्वत: विषयी, कुटुंबाविषयी खूपशी माहिती दिली आहे . सोशल मीडिया वरील ट्रोलिंग बाबत त्या सांगतात की मी कधीच कोणाची जात पहिली नाही. मी कोणत्या समाजाची आहे याची कोणाला माहितीही नसेल. मला त्यात पडायचे नाही. मी कोणत्याही समाजाविरुद्ध नाही. तरीही मी वंजारी समाजाविरुद्ध बोलले असा अजेंडा राबवला गेला. जुनी घटना, एके दिवशी मला फोन आला खडसे विरोधी बोलायचे बंद कर. तू फॅमिली वाली दिसते. तो नंबर ‘टरु कॉल’वर दाऊद असा दिसला.पाकिस्तान मधून होता. मी पोलिसाकडे दिला त्याचे काय झाले अद्याप कळले नाही . या वेळी घरचे आता बस झाले म्हणाले पण सर्वच शांत झाले तर बोलायच नाही का कोणी ?म्हणून मी लढा चालू ठेवायचे ठरवले . नितीन गडकरी, शरद पवार, केजरीवाल, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, संजय राठोड, अब्दुल सत्तार ( मंत्री मंडळात समावेश झाल्याबद्दल ) धनंजय मुंडे, जयकुमार गोरे यादी वाढतच आहे. जनता जनार्दन खुश आहे. बड्या सत्ताधाऱ्या विरुद्ध, राजकीय नेत्याविरुद्ध कधी मोठया आवाजात बोलले देखील जायचे नाही तेथे अंजली दमानियांच्या अंगात दामिनी संचारते व सर्व काही बिनतोड पुराव्यानिशी बोलले जात असल्याने व कायदेशीर लढाईचे सर्व मार्ग सरकारी नियम व जनतेच्या हक्कासह माहिती असल्याने कोणी जाहीर शाब्दिक खेळ करून अथवा कुत्सित बोलून आडवा आलाच तर नंतर दीर्घ काळा पर्यन्त गप्प होतो. अशा लढवय्या महिलेस निवडणुकीत मात्र यश नाही.2014 मध्ये आप च्या तिकीटावर लढलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठ्या मतांच्या फरकाने भाजप चे नितीन गडकरी यांनी पराभव केला होता. परंतु तरीही त्या नागपुरच्या असल्याने व सत्ताधारी भाजप त्यांच्याविरोधी फारसा जोर लावत नसलेने त्यांना आतून सहानुभूति असावी अथवा सध्या इतर पक्ष त्यांच्या रडार वर आहेत यात समाधान असावे. T
त्या म्हणतात माझ्या घरी 1 रु चा ही काळा पैसा येत नाही. पिता आर एस एस शी संबंधित होते. पती अनिश दमानिया सीए तील रॅंक होल्डर आहेत. जे एम फायनान्शियल कंपनीचे एमडी व सी ईओ आहेत. मी जग फिरले आहे. मी ऑनलाइन माध्यमातून ही माहिती काढते . त्याचे सोर्सही समोर ठेवते. याची प्रिंट घेऊन मी सरकारी कार्यालयात जाते. आजचे राजकारणी उद्याचे ‘दादा’ असू शकतात म्हणून त्यांच्या बरोबर मी एकाच व्यासपीठावर जात नाही .मी सांताक्रुज मध्ये 25 वर्षे डायग्नोस्टीक सेंटर चालवले आहे. मी आणि माझ्या नवऱ्याने 2 कोटी 8 लाख 81 हजार एवढा आयकर भरला आहे यावरून तुम्हाला आमच्या उत्पन्नाचा अंदाज येईल.
2011 आण्णा हजारे यांच्या इंडिया अगेस्ट करपशन मोहिमेत अंजली दमानिया यांनी भाग घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 2010 -11 मध्ये 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. त्याच वेळी जल संपदा खात्यातील विजय पांढरे यांनी सिंचन प्रकल्पातील गैरप्रकारांची माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिले व अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला . फडणवीस, खडसे, गिरीश महाजन यांच्या सह केजरिवाल यांच्या इंडिया अगेंस्ट करपशन संघटने मार्फत अंजली दमानिया यांनी अनेक पत्रकार परिषद घेत आंदोलन उभे केले. अखेर 25 सप्टेंबर 2012 रोजी अजित पवार यांनी राजीनामा दिला.
2012 मध्ये आम आदमी पक्षाच्या सदस्य आणि प्रवकत्या पदावर असताना तेव्हाचे बीजेपी चे अध्यक्ष नितीन गडकरी आणि एनसीपी चे अध्यक्ष शरद पवार यांचे आपापसात व्यावसायिक संबंध असल्याचे आरोप केले होते. गडकरी यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले. गडकरी यांच्यावरील खुर्सापुर शेती जमिन व पूर्ती पॉवर अँड शुगर लि.बाबत आरोपानंतर आयकर विभागाने छापे टाकले होते. भाजपा मधील इतर नेत्यानी गडकरींच्या विरोधात टीका केल्यावर 2013 मध्ये गडकरी यांनी अध्यक्षपद सोडले. याच वर्षी माहिती अधिकार कायद्याद्वारे कोंढणे धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार दमानिया यांनी उघडकीस आणला
2015 मध्ये दमानिया यांनी आप चे सर्वोसर्वा केजरीवाल यांच्यावर घोडेबाजार व भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि आप पक्ष सोडला . छगन भुजबळ यांनी बनावट कंपन्या मार्फत मनी लौंडरिंग केल्याचा, महाराष्ट्र सदांच्या बांधकामात दिल्लीत घोटाळा केल्याचा ,सांताक्रूझ येथील फ्रांसईस फर्नांडिस कुटुंबाचे घर लाटल्याचा आरोप झाले. अंजली दमानियानीही विविध आरोप केले. न्यायालयाने नंतर लाच लुचपत प्रतीबंधाक विभागस आदेश दिले व 2016 मध्ये त्यांना अटकही झाली. अंजली दमानियानी विशेष दखल घेऊन वृद्धा डोरीन फर्नांडिस केस लढल्याने राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना साडे आठ कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागले.भोसरी एमआयडीसी तील सर्वे क्रमांक 52 मधील तीन एकर जागेचा खडसेंचा व्यवहार पुण्यातील व्यावसायिक हेमंत गांवंडे यांनी समोर आणला. अंजली दमानियानी ही या कथित घोटाळ्याची कागद पत्र बाहेर काढली. जून 2016 मध्येअंजली दमानिया यांनी या विरुद्ध आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. 4 जून 2016 रोजी एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला.
पुण्यातील अग्रवाल हीट अँड रन केस मध्ये अनिश अवधीया आणि अश्विनी कॉस्टा यांचा मृत्यू झाला होता. यातील सासून मध्ये झालेले फेरफार व इतर हस्तक्षेप अजित पवार गटाच्या आमदारांनी केला असे सांगत त्यांनी थेट अजित पवारांवर टीका केली होती . पुणे अपघाता नंतर अजित पवार यांनी पोलिस आयुक्त यांना फोन केला होता त्यांचा फोन जप्त करावा व त्यांची नारको टेस्ट करावी असे त्या स्पष्ट बोलल्या होत्या . राष्ट्रवादी कॉँग्रेस – अजित पवार गट मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत पक्षाला व नेत्याना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा सुपारी घेऊन उद्योग चालवला आहे असा आरोप केला होता. त्यानंतर दमानिया कुटुंबा सह परदेशात फिरायला गेल्या तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटातील सूरज चव्हाण यांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती . कष्टाच्या पैशानी कोठे फिरलात ते सांगा असे चव्हाण म्हणाले होते. तसेच त्या नंतर त्या परदेशातून आल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मी सर्व आरोपाना उत्तर देणार आहे व काहीना धडा शिकवणार आहे असे म्हणाल्या होत्या. अजित पवार यांनी 5 डिसेंबर ल उप मुख्य मंत्री म्हणून शपथ घेतली त्या नंतर आयकर विभागाने त्यांच्या कुटुंबियाशी संबंधित सुमारे 1 हजार कोटीची मालमत्ता मुक्त केली त्यानंतर आपल्या तळपायांची आग मस्तकाला गेली आहे असे त्या म्हणाल्या होत्या.
बीडचे संतोष देशमुख निर्घुण हत्या प्रकरण विशेष प्रखरतेने मागील 3 महिन्यापासून त्यांनी लावून धरले. परळी, बीड मधील भ्रष्टाचार, परळी येथील औष्णिक वीज केंद्रातील राखेची अवैध वाहतूक व विक्री , मुंडे व वाल्मिकी कराड यांचे संबंध, मुंडेयांच्या सातपुडा बंगल्या वरील खंडणीची बैठक, वारंवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क करून एकंदरीतच त्यांनी पोलिस, प्रशासन व मंत्रीमंडळ यावरील दबाव कायम ठेवला होता. आपले लक्ष्य स्पष्टपणे या सर्वमागील ‘आका’ असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले होते. त्यातूनच नीतीमत्ता, आरोग्य असे नेहमीसारखे शाब्दिक गोंधळ निर्माण करत अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. अंजली दमानिया मात्र थांबल्या नाहीत व त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. एका ऐतिहासिक घराण्यातील स्त्रीला (स्वराज्याचे सरसेनापती – हंबीरराव मोहिते यांचे घराण्यातील ) त्रास देणारे जयकुमार गोरे या पूर्वीही याच गुन्ह्यासाठी तुरुंगात गेले होते व आता मंत्री झाल्यावर त्यांचा त्रास आता अजूनच वाढला आहे असे अंजली दमानिया म्हणत आहेत व त्यांनी जयकुमार गोरे सारख्या मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढून टाकले पाहिजे असे वक्तव्य केले आहे.