नवी दिल्ली : वृत्तसेवा
श्यामकेंट, कझाकस्तान – येथे पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनिश भानवालाने जबरदस्त कामगिरी करत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. २२ वर्षीय अनिशने अंतिम फेरीत अचूक नेम साधत एकूण गुणांच्या अत्यंत जवळ पोहोचून सुवर्ण पदकासाठी जोरदार झुंज दिली. मात्र, केवळ एका गुणाने सुवर्णपदक हुकले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या सुवर्णपदक विजेत्या शू लियानबोफानपेक्षा फक्त एक गुण कमी पडला. कांस्यपदक कोरियाच्या ली जेक्युनने जिंकले.
पहिल्या चार सीरीजमध्ये अनिश एका गुणाने आघाडीवर होता, परंतु त्यानंतर तो मागे पडला. या स्पर्धेत सहभागी असलेला आणखी एक भारतीय आदर्श सिंह पाचव्या स्थानावर राहिला. मंगळवारी ३०-शॉट प्रिसिजन राउंडनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ सुवर्णपदक विजेता अनिश २९० गुणांसह सहाव्या स्थानावर होता.
हरियाणाचा नेमबाज बुधवारी रॅपिड फायर राउंडमध्ये २९३ गुणांसह एकूण ५८३ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला. सहा खेळाडूंच्या अंतिम सामन्यात अनिशने १८-१७ अशी आघाडी घेतली होती, परंतु उर्वरित तीन सीरीजमध्ये पाच शॉट्स चुकवल्यामुळे त्याला चीनच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला.
अनिशने या वर्षी त्यानं पेरूमधील लिमा येथे झालेल्या विश्वचषकात रौप्य पदक जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी कोरियातील चांगवोन येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनिश भानवाला यांनी कांस्यपदक जिंकले होते. मंगळवारी अनिश (५८३), आदर्श सिंह (५८५) आणि नीरज कुमार (५७०) या तिघांनी एकूण १७३८ गुण मिळवून या स्पर्धेतील सांघिक रौप्य पदक जिंकले.