प्रसारमाध्यम डेस्क :
आंध्र तेलंगणाप्रमाणेच खंडेरायाची अनेक मंदिरे कर्नाटकात आहेत. कर्नाटकात मैलार, मल्लया, मैलारलिंगेश्वर, राऊतराय, मैलारखंडोबा अशा नावांनी खंडोबा ओळखला जातो. हिरे मैलार, देवरगुड्ड, यातगिरी, देवरहिप्परगी, मंगसुळी, प्रेमपूर, देवी होसूर शिग्गेहळी, देवरपट्टणम्, धारवाड या ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून, कर्नाटकात खंडेरायाचे लाखो भक्त आहेत. गंगीमाळव्वा आणि कुरबत्यव्वा अशा दोन बायकांसह मल्लया कर्नाटकात नांदतो आहे.
गंगीमाळव्वा उच्च जातीमधली असून, कुरबत्यव्वा कुरबा जातीची आहे. कुरबत्यव्वास, तुप्पदमाळव्वा आणि तुरगबाली अशीही नावे असलेली दिसतात. हिरे मैलार येथे तर सुमारे सहा फूट उंचीची बैठी मल्लयाची मातीची मूर्ती आहे. “मण्णू मैलार’ असे त्यास संबोधले जाते. गोव्यातील म्हार्दोळ येथेही खंडोबाचे मंदिर आहे.
दक्षिण भारताच्या या तीन-चार राज्यांमध्ये मैलार मल्लणा- खंडेरायाची मोठमोठी मंदिरे असून, लाखो भक्तांच्या उपस्थितीत खंडेरायाचा यात्रा-उत्सव साजरा केला जातो. चैत्र, कार्तिक, माघ, मार्गशीर्ष या महिन्यांत यात्रा भरविल्या जातात. दसरा-दिवाळी, सोमवती अमावस्या हे यात्रेचे महत्त्वाचे दिवस आहेत.
यात्रेतील अनेक विधिविधानांपैकी खंडेराया आपल्या सर्व साथीदारांसह जंगलात शिकारीला जातो. आपल्या लवाजम्यासह युद्धावर जातो. शिकारा खेळणे, युद्धाचा नकली खेळ खेळणे आणि विवाह सोहळा पार पाडणे, या गोष्टींना यात्रेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. या वेळी खंडेराया घोड्यावर आरूढ असतो. तलवारी, भाला, धनुष्यबाण, मुसळ आ शस्त्रांचा वापर या वेळी केला जातो. सोबत घोडे, कुत्रे, मेंढरे यांसह शस्त्रधारी सैनिक असतात. अंगावर शस्त्रप्रहार करून रक्त काढणे, जखमांवर भंडारा टाकून जखमा बांधणे अशा क्रिया केल्या जातात. या सर्व गोष्टी खंडेरायाच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या आहेत.
खंडेराया मुळात एक ऐतिहासिक लढवय्या शूर वीर असल्याचे ते निदर्शक आहे. कर्नाटकात खंडोबाच्या सैन्याला “कंचवीर’ अशी संज्ञा वापरली जाते. डॉ. गुंथर सोन्थायमरच्या ग्रंथाचे नावच मुळी “किंग ऑप हंटर्स, वॉरिअर्स अँड शेफर्ड’ असे आहे. हे ग्रंथनाम खंडेरायाच्या ऐतिहासिक लढवय्या वीर असलेल्या बाबीवर शिक्कामोर्तब करणारे आहे.
मुळात लढवय्या वीर असणाऱ्या व्यक्तीला आदरापोटी लोकांनी देव मानले आणि कालांतराने शंकराच्या तारकथा खंडेरायाशी जोडल्या गेल्या. या अवतारात इतक्या प्रभावी ठरल्या, की लोकांना मैलार- मल्लाणा खंडेरायाच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण झाले.
पुढील अखेरच्या खंडात पाहू. पंथपरंपरा खंडोबाची ‘टाक ‘ …..






