डाॅ.राजेंद्र पारिजात, कोल्हापूर
२४ तास समाज आणि जगाचा विचार करणाऱ्या या क्षेत्रात अनंत दीक्षित सर संयमी, विवेकनिष्ठ आणि अभ्यासू पत्रकार होते. त्यांच्या उत्तर आयुष्यात आजारपण आणि कौटुंबिक दु:खामुळे त्यांची स्थिती डळमळीत झाली, पण विचारांचा पाया कधीही ढळला नाही. ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ या ब्रीदाचे ते खरे उदाहरण होते.
कोल्हापुरात ‘सकाळ’चे संपादक म्हणून अनंत दीक्षित आले आणि तेव्हापासून माझा त्यांच्याशी संपर्क सुरू झाला. हा संबंध हळूहळू वृद्धिंगत होत गेला. पहिली भेट महाभारत मालिकेनंतर एका सर्वेक्षणासाठी झाली होती. त्यानंतर पर्यावरण, आरोग्य आणि निवडणूक विषयक अनेक सर्वेक्षणांच्या निमित्ताने आमचा सुसंवाद अधिकच गडद होत गेला.
मराठी पत्रकारितेत दीक्षित साहेबांनी पत्रकारितेचा नवा प्रवाह सुरू केला, असे ठामपणे म्हणता येईल. वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवण्या, विशेषांकांच्या निमित्ताने आमची चर्चा होत असे. त्या वेळी ते नेहमी एमआयडीसीमधील ऑफिसमध्ये भेटत आणि अत्यंत खुलेपणाने संवाद साधत. सार्वजनिकच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही अनेकदा एका फोनवर त्यांनी मदतीच्या राशी उभ्या केल्या. माध्यमांच्या आरशातून कोल्हापुरातील चळवळींना त्यांनी नवे दार उघडून दिले. त्यामुळे कोल्हापुरी माणूस माध्यमांच्या दरबारात ताठ मानेने उभा राहू लागला.
ते मूळचे कोल्हापूरचे नव्हते, पण त्यांनी कोल्हापुरावर प्रेम करायला सुरुवात केली आणि कोल्हापुरानेही त्यांना आपले मानले. असंख्य लोकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा इतका खोल होता की, ते निवृत्तीकडे वळले, हे कुणाला जाणवलेच नाही. पुण्यात गेल्यानंतरही ते आमच्या संपर्कात राहिले.
मी पीएच.डी. पूर्ण करत असताना तथाकथित संशोधन पद्धती व मर्यादांवर माझा विश्वास नव्हता. त्यामुळे मी चॉम्स्कीपासून रमा बिजापूरकरांपर्यंत चौफेर वाचन करून माझा प्रबंध लिहिला. या संशोधनात उमटलेले सत्य कोणा समंजस आणि जाणकार व्यक्तीसमोर मांडावे, हे अवघड होते. पण दीक्षित सरांनी सुमारे दीड तास फोनवर संपूर्ण काम समजून घेतले. थोडा वेळ घेऊन त्यांनी सांगितले, “तुमचे काम हे माध्यमांचाच एक आरसा आहे. विद्यापीठ त्याला कितपत मान्यता देईल, माहीत नाही, पण हे संशोधन अस्सल आहे.”
त्यांचे हे शब्द मला डिग्रीपेक्षा मोठे वाटले. पुढे २०१४ साली मला डिग्री मिळाली. दुर्दैवाने, शिक्षक म्हणून ना मंजुरी मिळाली, ना संशोधनाची संधी. त्यामुळे मी ॲक्शन रिसर्च आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लिखाण सुरू केले. माझे निरीक्षण होते की, आपण अतिव्यक्ती वादाच्या दिशेने जात आहोत आणि अमेरिकन मॉडेल्स आपल्यावर अधिक प्रभाव टाकत आहेत.
ही निरीक्षणे सत्य मान्य केली जात होती, पण माहितीच्या महापुरात कोणी थांबून विचार करत नव्हते. दीक्षित साहेबांच्या समीक्षेमुळे मला आजही माझ्या निरीक्षणांवर ठाम राहता आले. म्हणूनच मी त्यांच्या ऋणात आहे.
शिवाजीराव देसाई यांचा मृत्यू जपानमध्ये झाला तेव्हा मी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ती बातमी रात्री दीक्षित सरांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देसाई यांचा मृतदेह कोल्हापुरात आणून अंत्यसंस्कार सुसूत्रतेने पार पडले. हा इतिहास फार थोर आहे.
शेवटच्या टप्प्यात त्यांचा फोनवर सतत संपर्क होता. उद्योग, व्यापार, चालू घडामोडींबाबत ते खूप अपडेट राहायचे. निखिल वागळेंच्या कार्यक्रमापूर्वी सुद्धा माहिती मागायचे. डायलिसिसच्या प्रक्रियेला ते कंटाळले होते आणि जीवनाच्या त्या अवस्थेला त्यांनी नकार दिला, असे वाटते. आणि एक दिवस बातमी आली – दीक्षित गेले.
त्या दिवशी कोल्हापुराने फार मोठा दीर्घ उसासा टाकला. बाहेरून आलेल्या या माणसाने शहरातील प्रश्न, परंपरा, आणि माणुसकीला माध्यमांच्या आरशातून जो उजाळा दिला, त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात ‘सकाळ’ झाली.
पण शेवटच्या काही वर्षांत त्यांच्या कार्याचा, त्यांच्या मोलाचा उल्लेख फार थोड्या ठिकाणी झाला. आज कोल्हापुरात सुरू असलेल्या कार्यक्रमात सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत, “आता दीक्षित हवे होते,” अशी भावना प्रकट होतेय. म्हणूनच सम्राट फडणीस, विजय चोरमारे, आदिनाथ चव्हाण, राधेश्याम जाधव, विश्वास पाटील आणि धनंजय बिजले यांनी ठरवलेला ‘दीक्षित स्कूल ऑफ जर्नालिझम’चा पुरस्कार हा केवळ कृतज्ञतेचा नव्हे, तर गुरुप्रती गौरवाचा अभिषेक आहे – तोही कुमार केतकरांसारख्या समंजस पत्रकाराला दिला जातोय.
शेवटच्या महिन्यांत दीक्षित सरांनी मला कधी कविता, कधी पुस्तकाविषयी सांगत खूप संवाद साधला. एकदा नुसरत फतेह अली खान यांचा नज्म त्यांना ऐकवला होता:
“आपसे मिलके हम कुछ बदल से गए,
शेर पढ़ने लगे, गुनगुनाने लगे…”
आणि त्यांच्याबाबत मला एकच ओळ आठवते –
“दीक्षित” – होमात आहुती घालणारा माणूस.
एकदा मी त्यांना म्हणालो, “तुमचे खूप सत्कार होऊ लागले, आता प्रस्थान ठेवा.” आणि खरंच, काही दिवसांनी त्यांनी कोल्हापूर सोडल्याची घोषणा केली.
नोस्टाल्जियामध्ये, “सकाळ…” असा दीर्घ उच्चार करणारे कोठावळे, पाठोपाठ दीक्षित म्हणायचे, “काय म्हणताय? चहा प्यायला या! तोवर अग्रलेख पूर्ण होतोय…”
आणि मी धडपडत टु व्हिलर काढायचो…
हे सगळं आठवलं की गलबलून येतं..
———————————————————————————–