Amravati Municipal Commissioner Soumya Sharma-Chandak received the award at a ceremony hosted by Union Minister for Environment, Forests and Climate Change Bhupendra Yadav in New Delhi.
अमरावती : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ अंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीच्या आधारे आणि पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालांमध्ये अमरावती शहराने ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात २०० पैकी २०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार म्हणून ७५ लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या सर्वेक्षणात वायू गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग, शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनाची भूमिका अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. शहरात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, रस्ते धूळमुक्त ठेवण्याचे उपक्रम, वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर आणि औद्योगिक भागात प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या. यामुळे अमरावती शहराने उल्लेखनीय प्रगती साधली.
महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत नागरिक आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “हे पारितोषिक अमरावतीतील प्रत्येक नागरिकाची सामूहिक उपलब्धी आहे. स्वच्छता विभागातील कर्मचारी, अभियंते, पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिक यांच्या योगदानामुळे हे यश शक्य झाले. आम्ही ‘हरित आणि स्वच्छ शहर’ बनवण्याच्या संकल्पाने पुढे जाऊ.”
अमरावतीने यापूर्वी स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात दुसरा आणि २०२३ मध्ये तिसरा क्रमांक मिळवला होता. सलग तीन वर्षे प्रगती करत यंदा थेट अव्वल क्रमांक मिळवणे ही शहरासाठी मोठी उपलब्धी ठरली आहे.
पर्यावरण मंत्रालयाने महापालिकांना स्वयंमूल्यांकन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करून निष्कर्षावर आधारित पुरस्कार जाहीर केला. या गौरवामुळे अमरावती शहराच्या पर्यावरणीय उपक्रमांना नवे बळ मिळाले असून भविष्यातही वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. संपूर्ण अमरावतीच्या नागरिकांचे आणि प्रशासनाचे यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.