The ceremony of the embrace of Goddess Ambabai and Goddess Trimboli will be held today.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्रौत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण ललिता पंचमी सोहळ्यानिमित्त आज (शनिवार, दि. २७) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात त्र्यंबोलीकडे मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्याचा मुख्य आकर्षण असलेला नवरात्र प्रतीक ‘कुष्मांड’ (कोहळा) भेदन विधी टेंबलाई टेकडीवर पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता अंबाबाईची पालखी त्र्यंबोली मंदिराकडे निघाली असून मार्गावर पायघड्या घालून भक्तांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
कुमारी स्वरा जयदीप गुरव
ललिता पंचमीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मध्यरात्री त्र्यंबोली मंदिरात अभिषेक व महापूजा करून कुमारिकेच्या हस्ते कोहळ्याचे पूजन झाले. शनिवारी दुपारी अंबाबाई पालखी त्र्यंबोलीत पोहोचताच अंबाबाई व त्र्यंबोली देवींच्या गळाभेटीचा सोहळा रंगणार आहे. या भेटीत कोहळा फोडण्याचा मान कुमारी स्वरा जयदीप गुरव हिला मिळाल्याने परिसरात उत्सुकता आहे.
टेंबलाई टेकडी परिसर आणि पालखी मार्ग रोषणाई, फुलांच्या सजावटीने फुलला आहे. कोल्हासुराच्या वधाचे प्रतीक असलेल्या या सोहळ्याचे स्वागत कमानी उभारून करण्यात आले आहे. विसाव्यासाठी शाहू मिल आवारात खास व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी दर्शनरांगेस पत्र्याचे शेड, सपाटीकरण केलेला रस्ता, तसेच पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे आणि विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली आहे.
कोहळा फोडल्यानंतर तुकडा मिळवण्यासाठी होणारी झुंबड टाळण्यासाठी पोलिसांचा मजबूत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक तसेच ग्रामीण भागातून हजारो भाविक या पारंपरिक भेट सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येत असून करवीर नगरीत भक्ती आणि जल्लोषाचा माहोल अनुभवायला मिळत आहे.