कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी ( दि.२३ ) पहाटे मंत्रोच्चार, पारंपरिक तालवाद्यांचा गजर आणि तोफेच्या सलामीतून विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला. देशातील ५१ शक्तिपीठांपैकी व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या पूर्णपीठात मागील दोन दिवसांपासून भाविकांचा उत्साह उसळला आहे.
उत्सवाच्या पूर्वसंध्येला दुर्गाज्योत नेण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या भाविकांच्या ‘उदं गं अंबे’ या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला. यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याने मांगल्याचे हे पर्व अनुभवण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत.
सकाळी ७.३० वाजता श्रीपूजक मुनीश्वरांच्या हस्ते मुख्य गाभाऱ्यात मंत्रोच्चार आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर घटस्थापना पार पडली. सकाळी साडेसहा, साडेआठ व साडेअकरा वाजता देवीला नित्याभिषेक करण्यात आला. सकाळी ९ वाजता मानकरी जाधव घराण्याकडून तोफेची सलामी देण्यात आली आणि त्यानंतर शासकीय पूजेनं नवरात्रोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली.

दुपारी दोन वाजता अंबाबाईची कमलादेवी रूपातील जडावी अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची फुलांनी सजवलेली पालखी गरुड मंडपातून मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. ललिता पंचमीला अंबाबाई-त्र्यंबोली भेटीचा सोहळा तर अष्टमीला नगर प्रदक्षिणा होणार आहे.

