कुरुंदवाड: प्रतिनिधी
राधानगरी धरणातील विसर्गानंतर आता कोयना व वारणा धरणातूनही आज सकाळपासून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेले दोन तीन दिवस धरण पाणलोटक्षेत्रासह सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी नियत्रिंत करण्यासाठी आज सकाळी ११ वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उघडून १६हजार,५६५ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. तर यापुर्वीच धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरु असून याद्वारे २१०० विसर्ग सुरु आहे. कोयनाधरणातुन असा एकूण १८ हजार,६६५ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.
वारणा धरणपाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्याने धरण पाणी साठ्यात सतत वाढ होत आहे. यामुळे जलाशय परिचलन सुचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या वक्र दरवाज्यातून ८६३० क्युसेक व विद्युतगृहातून सुरु असलेला १६३० क्युसेक असा एकूण १०२६० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे. पाऊस कमी अथवा वाढल्यास धरणात पाण्याची आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी – जास्त करण्यात येणार आहे.विविध धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे.यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शिरोळ तालुक्यातही काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून क्षणात पाऊस पडतो. तर लगेच दोन मिनिटांत ऊन पडते यामुळे तालुक्यात ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा – पंचगंगा नदीचे पाणी आत्ता कुठे पात्रात विसावत होते. यामुळे नदीकाठावरील गावांनी पुरापासून सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र राधानगरी,कोयना व वारणा धरणातून आजपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्यामुळे येथील कृष्णा – पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होणार आहे. परिणामी शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या ग्रामस्थामध्ये धाकधुक वाढली आहे.