कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या सणाचे महत्व आहे. देशभरातील हिंदू आणि जैन धर्मीय लोक अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरी करतात. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. याला अखाती तीज असेही म्हणतात.
पौराणिक श्रद्धांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. याच दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती नर-नारायण या जोड देवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप केले होते. लोकांना आहार दानाचा योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजून पुढील सहा महिने आहार घेता आला नाही. अर्थात त्यांचा वर्षभर उपवास झाला. हस्तिनापुर येथे आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.
अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते.
याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनी सुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळतं असे देखील म्हणतात. ‘न क्षय इति अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय होय. त्यामुळे या दिवशी जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय्य होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. या दिवशी शुभ मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे अनेक जन्मांपर्यंत फळ मिळते. वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जाणारा हा दिवस नशीब, यश आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. ज्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी किंवा धातू आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा एक चांगला काळ बनतो.
या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीत चंद्राची स्थिती देखील मजबूत होते असे मानले जाते.
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर फक्त शुभकार्य, दान नाही तर, या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि पिंड दान करण्याचेही महत्त्व आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. पितरांसाठी मातीचे भांडे दान करतात. उन्हाळ्यात जलयुक्त घट दान अर्पण केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभतो..पळसाच्या पत्रावळीवर आणि द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे, चीचोनी, पापड, कृरुड्या इत्यादी पदार्थ वाढतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.
देशातील विविध राज्यात, प्रांतात विविध जाती धर्मात अक्षय तृतीय हा सण विविध प्रथा परंपरा आणि धार्मिक विधी करून साजरा केला जातो.
- देशातील काही भागात कृषी संस्कृतीचे पालक म्हणून बलरामाची पूजा करण्याची प्रथा आहे.
- बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे महत्व मोठे आहे.
- उत्तर भारतात या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे, असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृंदावन स्थित श्री बांके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं.
- उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात. नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणाचे दरवाजे जवळपास सहा महिने बंद असतात आणि आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात, पण मंदिराचे दरवाजे बंद असतानाही आतमध्ये अखंड ज्योत असते.
- ओरिसा मध्ये या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हणले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. याच दिवशी प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ होतो. देवाच्या नौका विहारासाठी पाच बोटी यानिमित्ताने सुशोभित केल्या जातात.
- दक्षिण भारतात महाविष्णू, लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन केले जाते.
- पश्चिम बंगाल मध्ये व्यापारी वर्गात हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.
- राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.
- महाराष्ट्रातील खानदेशात हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात सुरु झालेला गौरी उत्सवाची सांगता किंवा शेवटचा दिवस देखील अक्षय तृतीय हाच असतो.
कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.
अक्षय तृतीयेचे महत्व सांगणारी कथा –
अक्षय्य तृतीयेची कथा ऐकून विधिपूर्वक पूजा आणि दानधर्म केल्याने सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते असे मानले जाते. या कथेला पुराणातही महत्त्व आहे. जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो व या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय्य तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले.
ही फार जुनी गोष्ट आहे. धरमदास नावाची एक व्यक्ती एका छोट्या गावात रहात होती. परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने त्यांना आपल्या उदरनिर्वाहाची सतत चिंता असायची. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्याने एकदा त्यांनी अक्षय्य तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. घरची गरीब परिस्थिती असताना या सर्व गोष्टी दान करण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला. तरीही त्यांनी आपला दान देण्याचा संकल्प पूर्ण केला.तिथून पुढे प्रत्येक अक्षय तृतीयाला त्यांनी पूजा आणि दान विधीचा उपक्रम थांबवला नाही. उपवास घडला, आजारपण आले, अगदी वृद्धापकाळात देखील त्यांनी यात खंड पडू दिला नाही. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे त्यांचा पुढील जन्म राजकुळात झाला. त्यांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते.अक्षय्य तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका. त्यांच्या अक्षय्य तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले.
ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय्य तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील, त्याला अक्षय्य पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. असे या कथेचे सार सांगितले जाते.
हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.
अक्षय्य तृतीयेचा हा दिवस माफीचा दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या किंवा आपल्या प्रियजनांकडून नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर त्याच्या सर्व चुका माफ होतात आणि त्याला देवांकडून आशीर्वाद मिळतात. झालेल्या चुकांसाठी माफी मागण्याचा आजचा खास आणि अतिशय चांगला दिवस आहे.
———————————————————————————————-